Pune News :  मंदिरे खुली करा – ‘दगडूशेठ’चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी या़ंची मागणी

एमपीसी न्यूज – लोकांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरे खुली करा, अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी केली आहे.

गेले सव्वा वर्ष टाळेबंदी, निर्बंध, साथीचा प्रादुर्भाव, आर्थिक नुकसान या कारणांनी लोकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. या निराशाजनक वातावरणातून बाहेर येण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्याची गरज आहे.

मंदिरांमध्ये होणारे देवाचे दर्शन, प्रार्थना, धार्मिक वातावरण हे सर्व भाविकांच्या श्रद्धा जपणारे असल्याने लोकांमध्ये असलेली कोविडच्या साथीविषयीची भिती दूर व्हायला मदत होईल. तसेच काही आजारांनंतर मानसिक स्थिती असंतुलित होते, त्याही वेळी मंदिरात जाण्याने मनाला उभारी मिळते. समाजातील श्रद्धा आणि धारणा लक्षात घेऊन, मनोवैज्ञानिक भूमिकेतून ही मागणी करत आहे, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

सरकारने प्रायोगिक तत्त्वावर सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळात मंदिरे खुली करण्याची परवानगी द्यावी. त्यानंतर १५ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील असंख्य भाविक, मंदिरांचे व्यवस्थापक, मंदिरावर अवलंबून असलेले व्यावसायिक या सर्वांच्या मनात मंदिरे खुली व्हावीत, हीच भावना आहे. त्यामुळे आता मंदिरे उघडी ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, असे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.