Pune News : मिळकतकरापोटी महापालिकेच्या तिजोरीत 1000 कोटींचा भरणा !

एमपीसी न्यूज – महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मिळकतकरापोटी महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. परिणामी आर्थिक टंचाईमुळे मरगळ आलेल्या महापालिकेला नवसंजीवनी मिळाली आहे.

पुणे महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात जवळपास 10 लाख 61 हजार मिळकती आहेत. त्यापैकी बहुतांश मिळकतधारक नागरिकांकडून वेळेवर मिळकत कर भरला जात नव्हता. त्यामुळे त्यांना महापालिका अधिनियमानुसार एकूण रकमेवर 2 टक्के प्रत्येक महिन्याला शास्ती कर लावला जात होता.

यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना देखील लागू करण्यात आली. या योजनेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या योजनेतून महापालिकेला 151 कोटी 43 लाख रुपये मिळाले. तसेच कायदेशीर कारवाई केल्यानंतर कुमार हौसिंग कॉर्पोरेशन कडून 1 कोटी 27 लाख रुपये, एस. ए. इन्फोटेक व एम. एस. लुविश इन्फो यांच्या कडून 53 लाख 98 हजार 350 रुपयांची वसुली झाली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतील मिळकतकरातून आलेल्या महसुलाची रक्कम एक हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे.

अन्य थकबाकीदारांना महापालिका प्रशासनाकडून नोटीसा पाठविण्यात आल्या असून थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाईनुसार सदर मिळकती सील केल्या जाणार असून शास्तीकर व विलंब दंडासह थकबाकी वसूल केली जाईल, असे मालमत्ता व मिळकतकर विभागाकडून कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.