22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

Pune News : विविध मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांनी केले अन्नत्याग आंदोलन

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : रेल्वेचे खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, रात्रपाळीच्या सिलिंग मर्यादेचा आदेश रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोना काळात आघाडीवर राहून रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवच द्यावे, आदी मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. पुणे स्टेशनजवळील रेल मंडल कार्यालय येथे हे आंदोलन केले गेले.

हे आंदोलन देशातील स्टेशन मास्तरांच्या ‘ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशन’च्या वतीने संपूर्ण देशभर झाले. आंदोलनाचा हा सहावा टप्पा होता. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, मंडल अध्यक्ष अमित वर्मा, मंडल सचिव सकील इनामदार. दिनेश कांबळे, एस के मिश्रा, अजय सिन्हा, अर्जुन कुमार, प्रल्हाद कुमार, मैथ्यू जॉर्ज, जे आर तांडले, सुनील गुप्ता, मनाली कुलकर्णी हे पदाधिकारी उपस्थित होते.

वारंवार आंदोलन करूनही रेल्वे प्रशासन स्टेशन मास्तरांच्या मागण्यांची दखल घेत नाही. उपोषणे, निषेध, विनंत्या करुनही आमच्या हातात काहीच लागणार नसेल तर पुढील आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल व त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील. सप्टेंबरमध्ये घेतलेल्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार देशात रात्रपाळी करणा-या स्टेशन मास्तर अधिकारी व कर्मचारी यांच्या भत्त्यात कपात करण्याचा निर्देश दिला गेला. पूर्वी रात्रपाळीसाठी स्टेशनच्या दर्जानुसार 8 ते 24 टक्के भत्ता दिला जात होता. आता 43,600 रुपये बेसिक सिलिंग मर्यादा ठेवली गेल्याने त्याहून अधिक पगार असलेल्यांचा भत्ता कमी होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आदेश काढून 1 जुलै 2017 पासून ज्यांना संबंधित मर्यादेहून अधिक भत्ता दिला गेला आहे, ते पैसे वळते करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अन्यायकारक निर्णय असून तो लवकर मागे, घ्यावा अशी आमची मागणी असल्याचे धनंजय चंद्रात्रे यांनी सांगितले.

या अगोदर स्टेशन मास्तरांनी रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांना 7 ऑक्टोबर रोजी ईमेल पाठवून विरोध दर्शवला. नंतर 15 ऑक्टोबर रोजी स्टेशन मास्तरांनी कामाच्या ठिकाणी मेणबत्ती पेटवून विरोध दर्शवला. तिसऱ्या वेळेस म्हणजेच 20 ते 26 ऑक्टोबर रोजी गणवेशावर काळी पट्टी लावून गाडी संचालन करत, मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी विनंती केली. चौथ्या टप्प्यात म्हणजेच 31 ऑक्टोबरला देशातील स्टेशन मास्तरांनी एकदिवसीय उपोषण करत विरोध नोंदवला तर पाचव्या टप्प्यात धरणे आंदोलने केली गेली आहेत.

spot_img
Latest news
Related news