Pune News : आमचे प्रश्न सोडवा;अन्यथा सत्तेपासून बेदखल व्हावे लागेल : बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दीड लाख रिक्षाचालक मालक आहेत. एक लाख फेरीवाले आहेत. गेली 14 महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे असंघटित कामगार कष्टकरी जनतेचे अतोनात हाल सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे वारंवार मागणी, मोर्चा आंदोलन करून प्रश्न सोडवले जात नाहीत, आमचे प्रश्न सोडवा. आमची दखल घ्या; अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत सत्ते पासून बेदखल करू, असा इशारा कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

पुणे येथे आयोजित प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते विठ्ठल गायकवाड यांच्या हस्ते महामाता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, कष्टकरी जनता आघाडी अध्यक्ष अनिता सावळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, टपरी पथारी हातगाडी पंचायत प्रदेश सचिव प्रल्हाद कांबळे, पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ टोपे, रमेश सगट, नवनाथ कोनसे, फिरोज शेख कष्टकरी जनता महिला आघाडीच्या शमिम शेख, रोहिणी, आयेशा अन्सारी, अलि शेख आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले, रिक्षाचालकांना फायनान्स कंपनी त्रास देत आहेत. आम्हाला साधी मुदतवाढ दिली जात नाही. पुणे महापालिकेने टपरी पथारी हातगाडी धारकांचे सर्वेक्षण केले पाहिजे. हॉकर्स झोन केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. धूणी -भांडी साफ सफाई कामगार महिला बांधकाम मजुरांच्या सर्व असंघटित कामगार कष्टकरी जनता कोरोणामुळे उद्ध्वस्त झाली आहे. त्यांच्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी आम्ही केली.

परंतु, निर्णय होत नाही. आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहरातील रिक्षाचालक फेरीवाले कष्टकरी जनतेने एकत्र यावे असे आव्हान देखील त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.