Sangvi News : सांगवीला पुराचा धोका, मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधा : अतुल शितोळे

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात पवना नदी व मुळा नदीला पूर आल्यानंतर सांगवी दापोडीला पुराचा फटका बसतो. घराघरात पाणी शिरते. कळस आणि खडकी दरम्यान जुन्या काळात बांधण्यात आलेला बंधारा या पुराला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी खडकी, बोपखेल व कळस या दरम्यान मुळा नदीवर बांधण्यात आलेला बंधारा तात्पुरत्या स्वरूपात तोडून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधावा, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांनी केली आहे.

याबाबत शितोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे आणि पिंपरी महापालिका आयुक्त यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यात शितोळे यांनी म्हटले आहे की, पावसाळ्यात दरवर्षी पवना नदी व मुळा नदीला पूर आल्यानंतर सांगवी दापोडीला पुराचा फटका बसतो. घराघरात पाणी शिरते. कळस आणि खडकी दरम्यान जुन्या काळात बांधण्यात आलेला बंधारा या पुराला कारणीभूत ठरत आहे.

या बंधार्‍यामुळे नदीला पाण्याची उंची दोन जादा मीटर वाढते. त्यामुळे सांगवी दापोडी परिसरात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरते आणि जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे आर्थिक मानसिक व शारीरिक नुकसान होते. यापूर्वी डेअरी फार्म व पिंपळेगुरव दरम्यान पवना नदीवर असलेल्या बंधारा तोडल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आणि त्यामुळे मोठा पाऊस येऊन कमी नुकसान झाले.

याचे कारण बंधारा तोडल्यामुळे पूर रेषा दोन मीटरने खाली गेली.  याच पद्धतीने जर कळस खडकी धरण दरम्यान चा बंधारा तोडला तर मुळा आणि पवना नदीचे नदीची पूर रेषा दोन मीटरने खाली जाण्यास मदत होईल.

मुळा नदीची हिंजवडी ते बोपखेल आणि पवना नदीची पिंपळेगुरव ते दापोडी या भागातील पूर रेषा 2 मीटरने कमी होईल. भविष्यात किती मोठा पूर आला  तर  नदीचे पाणी शहरात शिरणार नाही. तथापि, बंधार्‍यातून ऑम्युनिशन फॅक्टरीसाठी 24 बाय 7 पंपिंग केले जाते. फायर फायटींगसाठी सज्ज राहण्यासाठी  कायमस्वरूपीची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

हा बंधारा चार भागात पाच पाच मीटर तोडून त्या तिथे कोल्हापूर पद्धतीचे गेट टाकल्यास पावसाळ्या पूर्वी ते काढून ठेवता येतील आणि पावसाळा संपल्यानंतर ते परत लावता येतील. ज्यामुळे पावसाळ्यात ह्या पुराचे पाणी व्यवस्थित होऊन जाईल. त्यामुळे वर्षानुवर्षे साठलेला गाळ वाहून जाईल, असे शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.