Pune News : खासगी शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थी आणि पालकांची होणारी लूट थांबवा : युवा सेनेची मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील खासगी शैक्षणिक संस्थाकडून ऑनलाईन शिक्षण देत असताना  जिमखाना, स्पोर्ट आणि लायब्ररी शुल्क वसुलीसाठी विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. या माध्यमातून पालकांची लूट केली जात असल्याची तक्रार पिंपरी विधानसभा युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात युवा सेनेच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांना निवेदन देत या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. विद्यार्थी आणि पालकांची होणारी लूट थांबविण्यासाठी शासनस्तरावरून ठोस उपाययोजना करण्याची मागणीही सरदेसाई यांच्याकडे करण्यात आली.

सावित्रीबाई फुले विद्यापीठात युवा सेना युनिटचे उदघाटन वरुन सरदेसाई यांच्या हस्ते आज ( गुरुवारी) करण्यात आले. त्यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी शैक्षणिक संस्थांकडून सुरु असलेली बेकायदेशीर शुल्क वसुली रोखण्यासाठी सरदेसाई यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

पिंपरी चिंचवड शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मार्च 2020 ते मार्च 2021 च्या काळात शैक्षणिक वर्षांत कुठल्याही प्रकारचे वर्ग चालू नसताना फक्त ऑनलाईन लेक्चरच्या नावाखाली जिमखाना फी, लायब्ररी फी, स्पोर्ट्स फी या शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून वसूल केली जात आहे. ज्या गोष्टीचा लाभ घेतला नाही त्यासाठी बेकायदेशीरपणे शुल्क वसुली केली जात असल्याकडे सरदेसाई यांचे लक्ष वेधण्यात आले.

या वेळी मावळ लोकसभा युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, मावळ तालुका अधिकारी अनिकेत घुले, पिंपरी युवती सेनेच्या प्रतीक्षा घुले, शर्वरी जळमकर, सागर शिंदे, अविनाश जाधव व पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.