Pune News : माणूस जोडण्यास शिकवते बंधुतेचे तत्वज्ञान – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज : महापुरुषांचे विचार समाजाला (Pune News) जोडणारे, देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहेत. मात्र, प्रत्येक जाती-धर्माने महापुरुष वाटून घेण्याची स्पर्धा लागल्याचे दिसते. जाती-धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण होत असताना बंधुतेचा विचार पेरण्याची गरज आहे. कारण बंधुता माणूस जोडण्याचे तत्वज्ञान शिकवते, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या संस्थाच्या वतीने नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात 24 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचा समारोपावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक कुमार पगारिया, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अरुण आंधळे, प्रकाश जवळकर, प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते.

माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि चिंचवड येथील (Pune News) प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे संस्थापक संचालक ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ डॉ. दीपक शहा यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन डॉ. सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. दळवी व शहा यांनी पुरस्काराच्या रक्कमेत प्रत्येकी 11 हजार रुपये घालून 32 हजारांचा निधी बंधुता परिषदेला सुपूर्त केला.

पुढील वर्षी होणाऱ्या 25 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ, तर स्वागताध्यक्ष पदी बंधुता प्रकाशनाच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. बंधुता मायमराठी पुरस्काराने मधुराणी बनसोड (वाशिम), सीमा गांधी (पिंपरी), सचिन शिंदे (उमरखेड), तुकाराम कांबळे (नांदेड), तेजस गायकवाड (सोलापूर), नरेंद्र पाटील (धुळे), साईनाथ फुसे (औरंगाबाद), घनशाम सावरकर (परभणी), प्रतिभा मगर (पुणे) व महादेव सुरवसे (परळी वै.) यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “अनेक महापुरुष संघर्षासाठी वापरले जात आहेत. अशावेळी प्रकाश रोकडे बंधुतेची पताका खांद्यावर घेऊन गेली पाच दशके समाजात बंधुता पेरण्याचे काम करत आहेत. याच विचारांवर चालणाऱ्या दळवी आणि डॉ. शहा यांचा सन्मान दिशादर्शक आहे.”

Pune : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे आदर्श महिलांना पुरस्कार

चंद्रकांत दळवी म्हणाले, “बंधुतेच्या नावाने मिळालेला पुरस्कार विशेष आहे. ‘गर्व से कहो बंधू है’ हा नारा घेऊन रोकडे गेली 50 वर्षे बंधुतेची चळवळ व्यापक करत आहेत. प्रशासनात काम करताना मीही बंधुभावाच्या विचारातून काम केले. हा विचार आणखी व्यापक करण्यासाठी चळवळीला जोडून घेतले आहे.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “दळवी यांनी प्रशासकीय सेवेतून, तर डॉ. शहा यांनी शिक्षण सेवेतून बंधुतेचा विचार जपला आहे. अशा कर्तृत्ववान व संवेदनशील माणसांमुळे समाजात बंधुता पेरण्यास मदत झाली. समाजाला एकसंध ठेवण्याचे काम बंधुतेचा विचार करतो. त्यामुळे त्यांचा आपण सर्वानी अंगीकार केला पाहिजे.”

शंकर आथरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सीए अशोक कुमार पगारिया, प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. दीपक शहा यांच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा शहा यांनी पुरस्कार स्वीकारला व पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.