Pune News : लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या 11 महापालिका कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून वरोवर करण्यात येत असताना देखील अनेक जण लसीकरण घेण्यास टाळाटाळ करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचा आकडा 11 वर गेला असून, त्यातील 9 जणांनी लस घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. तर 2 जणांनी फक्त एकच डोस घेतला होता. त्यामुळे लस घेण्यास केलेली टाळाटाळ करणे या कर्मचाऱ्यांनाच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे.

शहरात फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा आकडा पन्नास हजारांच्या पुढे गेला होती , त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची जवळपास 18 हजार जणांची यंत्रणा आता कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांच्या कामात आहेत. त्यात प्रामुख्याने कोविड केअर सेंटर चाचण्यांची केंद्रे, हॉस्पिटल हि ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी कोरोना होण्याच्या अधिक संभावना असते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल 668 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात 553 कायमस्वरूपी तर 115 कंत्राटी कर्मचारी होते, तर तब्बल 50 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या लाटेत शहरात अडीच लाख नागरिक बाधित झाले. त्यातील पालिकेच्या 127 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर, एकाचा मृत्यू झाला. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यूचा आकडा वाढला असून, आणखी 10 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या मृत्यूंची चौकशी केली असता; यातील 9 कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍तांनी मार्चच्या अखेरीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष आदेश काढून तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घ्यावे असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.