Pune News : संजय राऊत यांच्या ‘त्या’ यादीची वाट पाहतोय : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही संस्था पुरावे असल्याशिवाय धाडी टाकत नाहीत. त्यामुळे राजकीय हेतूने या धाडी टाकल्या जातात हे म्हणणं अत्यंत चुकीचे आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, की 100 ते 150 जणांची यादी आमच्याकडे आहे. आम्ही त्या यादीची वाट पाहतोय, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत राऊत यांना दिले.

दरम्यान, ईडी आणि प्रताप सरनाईक यांच्यातील तो विषय आहे, असे म्हणत या विषयाबाबत जास्त बोलणं फडणवीस यांनी टाळले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या आंदोलनाची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे केल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरती का होईना दखल घेतली. आम्ही विविध समस्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रांना उत्तर नाही, विरोधकांशी चर्चा नाही, साधी एक बैठकही घेतली नाही.

आणि उलट पंतप्रधानांकडे तक्रार करता. सरकार मनमानी कारभार करणार असेल, कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असेल तर आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत राहू, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.