Pune News : किरकोळ कारणावरून खराडीत अल्पवयीन मुलावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आलाय. खराडी भागात ही घटना घडली. याप्रकरणी निलेश वाघमारे (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १७ वर्षीय मुलाने तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  संबंधित अल्पवयीन मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थिटेवस्तीत आला होता. यावेळी येथे एकजण उभा होता. त्याने या अल्पवयीन मुलाला मेडिकलमधून कंडोम आणण्यास सांगितले. या मुलाने त्याला नकार दिला. त्याचा राग आल्याने या आरोपीने हाताने मारहाण केली. माझे काम ऐकत नाही, असे म्हणत वडा-पावच्या गाड्यावरील चाकू आणून मुलाच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

नागरिकांनी या मुलाला तत्काळ रुग्णालयात नेले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल जाधव करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.