Pune News : 25 वर्षांपासून महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता मग भाजपा दोषी कसे काय ?

महापौर मुरलीधर मोहोळ यांचे खा.सुप्रिया सुळे यांच्या टिकेवर प्रत्युत्तर

कात्रज – आंबिलओढा परिसरात महापालिकेकडून चोख काम झाल्यामुळे नुकसान कमी

एमपीसी न्यूज : महापालिकेमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. ज्या परिसराचा खासदार सुप्रिया सुळे उल्लेख करतायत तेथे त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. मग गेल्या ३ वर्षांच्या आमच्या सत्ताकाळात भोंगळ कारभार झाला, असा आरोप करणे योग्य नाही. आपत्ती काळात विनाकारण राजकारण करू नये, असे आवाहन करत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, “वास्तविक पाहता गेल्या वर्षी 74 मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यावेळी कात्रज, धनकवडी ते आंबिल ओढ्याकडेला राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून संरक्षण भिंतीची देखभाल दुरूस्ती केली. अजूनही काम सुरू आहे.

नदी आणि नाल्या शेजारील काही घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. वॉर्ड ऑफिसेस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काळजी घेतली. त्यामुळे कमी हानी झाली. परंतु काल 97 मिलीमीटर पाऊस पडून देखील तुलनेने नुकसान कमी झाले.”

“ज्या भागाचा खासदार सुळे उल्लेख करत आहेत. तो कात्रज, धनकवडी आणि आंबिल ओढ्याचा भाग तिथे गेली अनेक वर्षे त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आहेत. त्यांनी विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला तो कुठे गेला. जबाबदारी फक्त सत्ताधारी पक्षाची नाही सर्वांची असते. तुम्ही सत्ताधारी असताना दूरदृष्ठी ठेवून काम केले असते तर ही वेळ आली नसती.

आता केवळ 3 वर्षे महापालिकेत सत्तेत आलेला आमचा भाजपा दोषी कसा काय, त्यामुळे असे आरोप खासदार सुळे यांनी करु नये. कोरोना असेल पूरसदृश्य आपत्ती काळात विनकारण राजकारण आणू नये,” अशी विनंती महापौर मोहोळ यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.