Pune : सवाईच्या चौथ्या दिवशी कंठसंगीत आणि सतारीसह सादरीकरण रंगले

प्राजक्ता मराठे यांच्या प्रभावी गायनाने पूर्वार्ध तर बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने उत्तरार्ध  झाला श्रवणीय

एमपीसी न्यूज – सवाईच्या चौथ्या दिवशी कंठसंगीत आणि सतारीसह सादरीकरण  (Pune)  चांगलेच रंगले .  प्राजक्ता मराठे यांच्या प्रभावी गायनाने पूर्वार्ध तर बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने उत्तरार्ध  श्रवणीय झाला.

युवा गायिका प्राजक्ता मराठे यांचे प्रभावी गायन आणि देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार यांच्या रंगतदार अशा गायन – सतारीच्या सह सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. ज्येष्ठ गायक, संगीतकार पं. राम मराठे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या युवा गायिका प्राजक्ता मराठे यांना यावर्षी आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते.

प्राजक्ता यांनी पूर्वा रागात ‘मालनहो’ हा ख्याल मांडला. त्याला जोडून पं. राम मराठे यांची ‘नारी चंचल चतुर सुघर’ ही बंदिश त्यांनी सादर केली. ‘पिया कर धर देखो धरकत मोरी छतीया.’, ही प्रसिद्ध रचना (यावरून ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ हे नाट्यपद रचले आहे) पेश केली.पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या संगीत मंदारमाला नाटकातील ‘हरी मेरो जीवनप्राण आधार’ ही मिश्र पिलू मधील भक्तीरचना सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘सोहं हर डमरू बाजे’ हे राग तोडी मधील नाट्यपद सादर (Pune) करून  गायनाची सांगता केली. त्यांना स्वप्नील भिसे (तबला),  सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम) तर सानिया वेलंगी आणि वैशाली कुबेर यांनी साथसंगत केली.

रसिकांशी संवाद साधताना प्राजक्ता म्हणाल्या,’ आजोबा पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने मला या स्वरमंचावर सेवेची संधी दिली, हे माझे भाग्य आहे,’.

 

त्यानंतर देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्या गायन आणि सतार सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कला परंपरेचा वारसा लाभलेल्या घरातील या कलाकारांनी ‘हेमंत’ रागात आलाप, जोड, झाला अशा वादन पद्धतीने सादरीकरणाची सुरवात केली. कंठसंगीतातून आणि सतार वादनातून एका पाठोपाठ एक आवर्तनातून हेमंत रागाचे रूप त्यांनी उलगडत नेले.

 

ध्रुपद शैलीतील नोमतोम करत एक वेगळाच श्रवणीय अनुभव या दोन्ही कलाकारांनी रसिकांना दिली. टप्पा अंगाने जाणारी द्रुत रचना सादर करून त्यांनी सांगता केली. त्यांना सत्यजीत तळवलकर यांनी तबल्याची पूरक साथ केली. दिगंबर जाधव यांनी तानपुरा साथ केली. गायन आणि वादन यांच्या या अप्रतिम सादरीकरणाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद (Pune) दिला. महोत्सवाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.

त्यानंतर  युवा पिढीचे प्रतिनिधी अभय सोपोरी यांच्या संतूर वादनातून रसिकांना अपरिचित रागांच्या सौंदर्याची अनुभूती मिळाली.तब्बल नऊ पिढ्यांची कलापरंपरा वारसा रूपाने लाभलेल्या अभय सोपोरी यांनी सुरवातीला राग नंदकौंस या अनवट रागात आलाप आणि जोड, असे सादरीकरण केले. काही स्वराकृती त्यांनी आधी गाऊन दाखवल्या आणि त्यापाठोपाठ संतूरवर त्या स्वरावली वाजवल्याने श्रोत्यांना एक वेगळा अनुभव मिळाला.

अभय यांनी त्यांचे वडील पं. भजन सोपोरी यांच्या सन्मानार्थ ‘भजनेश्वरी’ राग निर्माण केला आहे. या रागातील वादनासाठी त्यांनी तबल्याची साथ स्वीकारली होती. झपतालातील रचना ऐकवून त्यांनी नंतर एकतालातील ‘तोरे बिन मै कुछ भी नही’ ही बंदिश पेश केली. काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांची शैव पंथ परंपरेतील रचना सादर करून त्यांनी विराम घेतला.त्यांना सत्यजीत तळवलकर यांनी तबल्यावर तर ऋषी शंकर उपाध्याय यांनी पखवाजवर वादनाची रंगत वाढवणारी साथ केली.

सवाईच्या चौथ्या दिवशीची सांगता ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने झाली. त्यांनी रागेश्री रागात ‘सगुन विचार’ हा विलंबित ख्याल मांडला. यानंतर त्यांनी मिश्र भैरवी मध्ये भवानी दयानी ही रचना प्रस्तुत केली. प्रकृती अस्वास्थ्य असूनही त्यांनी अगदी मोजक्या वेळात त्यांनी रागरूप दर्शवले.बेगम परवीन सुलताना यांना पं. श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम), पं. मुकुंदराज देव (तबला) यांनी तर शादाब सुलताना खान, विद्या जाईल, आम्रपाली तांबे यांनी साथ केली.

पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना यावर्षीचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार (Pune) यावर्षी पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना आज महोत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रदान करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना 2007  सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी सदर पुरस्कार देत गौरविण्यात येते. रोख रु. 51 हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे दा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पंडित उपेंद्र भट, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना बेगम परवीन सुलताना म्हणाल्या, ” भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे माझ्या मोठ्या भावासारखे होते. आज वत्सलाबाई जोशी या माझ्या वहिनीच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.  या पुरस्काराने मला आणखी चांगली कामगिरी करायची ऊर्जा मिळाली आहे, आणि जबाबदारी देखील वाढली आहे. वत्सलाबाई जोशी यांच्या हातचे पोहे मी अनेकदा खाल्ले आहे. पोहे जेव्हा छान होत तेव्हा पोहे सूर में बने है… अशी दाद आम्ही सर्वच जण देत असू, अशी आठवण देखील बेगम परवीन सुलताना (Pune) यांनी सांगितली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.