Pune : फिल्मी स्टाईलने रिक्षा अडवून प्रवाशांना लुटले

एमपीसी न्यूज – फिल्मी स्टाईलने रिक्षा अडवून रिक्षामधील प्रवाशांना लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान कसबा पेठ येथील देवजीबाबा चौकाजवळ घडली.

याप्रकरणी मोहित पवार (वय 17, रा. तळेगाव दाभाडे) याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सागर त्रिंबक ढवळे (वय 21, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहित हा सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान देवजीबाबा चौकाजवळून एका रिक्षाने आणखी एका प्रवाशासोबत जात होता. त्याचवेळी पाठीमागून अचानक तिघेजण अॅक्टीव्हा गाडीवर आले आणि त्यांनी रिक्षाच्या पुढे गाडी नेऊन रिक्षा अडवली.

त्यानंतर अॅक्टीव्हा गाडीवर बसलेल्या तीन जणांपैकी दोघांनी रिक्षात बसलेल्या मोहित आणि आणखी एका प्रवाशाला मारहाण करून जबरदस्तीने मोहितच्या पॅन्टच्य़ा खिशातील 7 हजार 300 रूपयांची रोकड चोरली. त्यानंतर तिघेजण तेथून पळून गेले.

याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या दोन्ही साथीदारांचा तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.