Pune : ड्रायफ्रुटस विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांच्या एटीएम कार्डची माहिती घेऊन फसवणूक करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज- ड्रायफ्रुटस विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांच्या एटीएम कार्डची माहिती घेऊन फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी शुक्रवारी (दि.4) थेरगाव येथून सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अटक केली.

शहाबुद्दीन ऊर्फ बबलू महमूद खान (रा.काळेवाडी, मूळ- बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2018 या दरम्यान बाणेर, पाषाण, औंध, बालेवाडी या परिसरात आत्माराम ड्रायफ्रुट कंपनीच्या नावाने अतिशय कमी दरात ड्रायफ्रुटसची विक्री करत असताना आरोपी हा ग्राहकाकडून बिलाची रक्कम रोख स्वरूपात न घेता स्वॅप मशीनचा वापर करत. आणि या स्वॅप मशीनद्वारे ग्राहकांच्या एटीएम आणि डेबिट कार्डची माहिती स्कीमरच्या मदतीने चोरत असत.

चोरलेल्या माहितीच्या आधारे क्लोन कार्ड तयार करून त्याच्याद्वारे दिल्लीमधील वेगवेगळ्या एटीएम मशीनचा वापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून त्यांची फसवणूक तो करत असे. अशाप्रकारे आरोपीने अनेक लोकांची फसवणूक करून जवळपास साडेतीन लाख रुपये काढले.
याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलीस त्याचा तपास करत होते. तपासा दरम्यान पोलिसांना खबऱ्याकडून त्याचा पत्ता मिळाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.