Pune : पाण्याच्या टाकीवर चढून मनोरुग्णाचे दोन तास थरारनाट्य

एमपीसी न्यूज- मानसिक संतुलन बिघडल्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी देणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी चातुर्याने पकडून त्याला वाचवले. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी सिंहगड रस्त्यावरील पाण्याच्या टाकीवर घडली. दोन तास हे थरारनाट्य रंगले होते.

विजय गजानन वारके (वय 29, रा. मुरगूड, ता. कागल, कोल्हापूर ) असे या तरुणाचे नाव आहे.

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रस्त्यावरील उंच पाण्याच्या टाकीवर एक तरुण चढला असून आरडाओरडा करीत मीडियाला बोलावण्याची मागणी करीत असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचारी दत्ता श्रीमंगणे आणि अमोल गणगणे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच वारके याने पोलीस वर आले तर मी उडी मरेन अशी धमकी दिली.

दरम्यान, अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. वारके याला वाचवण्याची मोठी जबाबदारी होती. टाकीच्या खाली जाळी लावण्यात आली. दत्ता श्रीमंगणे आणि अमोल गणगणे दोघेही टाकीवर चढले. श्रीमंगणे यांनी विजय वारके याला बोलण्यात गुंतवले. तर गणगणे यांनी वारके याला पाठीमागून जाऊन पकडले. अखेर दोन तासांच्या थरार नात्यास विजय वारके याला खाली आणण्यात यश आले.

वारके हा सध्या जनता वसाहतीमध्ये राहत असून आपली मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे वारके याने पोलिसांना सांगितले. वारके याला त्याच्या बहिणीकडे सुपूर्द करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.