Pune : खाकी वर्दीतली माणुसकी! ; ‘तुम्ही देशांच्या सीमांचे रक्षण करा, आम्ही तुमच्या आई-वडिलांची काळजी घेऊ’!

एमपीसी न्यूज – वेळ रविवारी (दि.5) सायंकाळी 5.30 वाजता, स्थळ दत्तवाडी पोलीस स्टेशन यांना सध्या भारतीय नौदलात मुबंईमध्ये ऑर्डनन्स डेपो घाटकोपर येथे पोस्टिंगला असलेल्या कॅप्टन गिरीश देडगे यांचा फोन आला. फोनवर देडगे यांनी आपल्या 75 वर्षाच्या आईला डोळ्याचा खूप त्रास होत असल्याने ती अंथरुणाला  खिळून आहे. तसेच वडील सुद्धा वयोवृद्ध असून लाॅकडाऊनच्या काळात त्यांनाही बाहेर पडणे अवघड झाले आहे त्यामुळे आईला डॉक्टरांचा सल्ला व औषधांची त्वरित गरज असल्याची विनंती देडगे यांनी फोनवर असणारे दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे यांना दिली. हवालदार शिरोळे यांनी ही माहिती दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना दिली. आणि थोड्याच वेळात पोलिस डॉक्टरांना घेऊन देडगे यांच्या वृद्ध आई पर्यंत पोहोचले.

कॅप्टन देडगे यांनी सांगितले की, त्यांचे वडील सुद्धा वयोवृद्ध असून आईची सुश्रुषा करण्यासाठी एक केअर टेकर आहे, त्या सुद्धा वयस्कर आहेत. लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने बाहेर जाणे त्यांना शक्य नाही. तसेच देडगे सुद्धा मुंबईमध्ये लॉकडाऊनमध्ये असल्याने लगेच येण्यासाठी परवानगी काढावी लागेल व त्यामध्ये वेळ जाईल. आईचा औषधोपचार पुण्यात मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये करत असल्यामुळे डोळ्यांच्या खाजगी दवाखान्यात कुणाकडे घेवून जावे हे सुद्धा वडिलांना माहीत नाही त्यामुळे पोलिस विभागाकडून मदतीची विनंती देडगे यांनी केली. फोनवर असणारे हवालदार शिरोळे यांनी  देडगे यांंना मदतीचा विश्र्वास देत, काळजी न करण्यास सांगितले.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक सुधीर घोटकुले, राहुल ओलेकर यांच्यावर डोळ्यांचे डॉक्टरची माहिती घेण्याची जबाबदारी सोपविली आणि तातडीने नवी पेठ येथे राहणाऱ्या डॉक्टर श्वेता गांधी यांना संपर्क साधून त्यांना एस पी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या देडगे यांच्या घरी पोहोचले. आजारी असणा-या वृद्ध आईच्या डोळ्यांची तपासणी करून औषध लिहून देण्यात आली व ती औषध कधी आणि कशी घ्यायची या बद्दल सर्व माहिती देडगे यांच्या वृद्ध आई वडिलांना समजावून सांगून सर्व औषध त्यांना मेडिकल दुकानामधून पोलिसांनी आणून दिली.

कॅप्टन गिरीश देडगे यांना त्यांच्या वृद्ध आईवर  झालेल्या सर्व उपचारांची माहिती दिली गेली व त्यांनी सुद्धा अत्यंत कमी वेळेत लॉकडाऊनच्या काळात पोलीस विभागाने वैद्यकीय सेवा मिळवून देण्यात दाखविलेल्या सक्रियतेबद्दल  समाधान व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या संक्रमण काळ असल्याने पुणेकर नागरिकांनी आपल्या घरी सुखरूप राहावे या करिता पोलीस विभागाने आवाहन केले आहे. नागरिक घरी असताना त्यांना काही वैद्यकीय आणि जीवनवश्यक वस्तूंच्या बाबत काही अडचण येऊ नये या साठी  पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सर्वतोपरी मदत करत आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.

या सर्व घटनेतून पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुसकी पाहायला मिळाली आहे. लाॅकडाऊनच्या काळात सर्व ठिकाणी विविध अडचणींना समोरे जात असताना पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी सर्वोतोपरी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.