Pune : पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कृतीतून दिला ‘सोशल डिस्टन्स’चा संदेश!

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे आपल्या घरी देखील ‘सोशल डिस्टन्स’ योग्य रीतीने मेंटेन करतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांना समाजाच्या प्रत्येक भागात जाऊन सर्व स्तरातील लोकांशी संपर्क करावा लागतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक पाटील हे आपल्या घरी सुरक्षित अंतर राखत आहेत. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे पोलिसांना सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. त्यांनी कृतीतून ‘सोशल डिस्टन्स’चा संदेश दिला आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे आपल्या घरी घराच्या बाहेर व्हरांड्यात जेवण करत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय घराच्या दारात बसून त्यांच्याशी चर्चा करत आहेत. तर त्यांची चिमुकली देखील त्यांना लांबूनच हाय, हॅलो करत आहे. पाटील आपल्या चिमुकलीशी आणि कुटुंबियांशी लांबूनच बोलत असल्याचे फोटोत दिसत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अनेक नियम आणि बंधने देखील घातली आहेत. हे नियम आणि बंधने केवळ नागरिकांसाठी नसून ते सर्वांसाठी समान आहेत. ‘कोरोना’ साथीचा विषाणू कोणतीही जात, धर्म, पद, प्रतिष्ठा बघून येत नाही. त्यांनी खबरदारी घेतली नाही, त्यांच्याकडे कोरोनाने धाव घेतलीच म्हणून समजा. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

पोलीस हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. कोणताही सण, उत्सव, राष्ट्रीय समारंभ असे कोणतेही काम पोलिसांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. समाजात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आपल्या कुटुंबाला देखील दुय्यम स्थान देऊन कर्तव्याला प्राथमिकता देतात. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक सहृदयता त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून दिसून येते. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे सोशल डिस्टन्स राखणे हे देखील त्याचेच एक प्रतीक म्हणावे लागेल.

पाटील यांनी पोलीस दलात हा एक आदर्श घालून दिला आहे. यामुळे पोलीस दलातील प्रत्येकाला आपले कर्तव्य बजावताना मानसिक तणाव येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.