New Delhi: भारतात एका दिवसांत नवे 896 रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,761, मृतांचा आकडा 37 वर

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल 896 ची पडली असून त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6,761 पर्यंत वाढला आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी रुग्ण वाढ आहे. नवीन 37 मृतांची नोंद झाल्याची कोरोनाच्या बळींची एकूण संख्या 206 झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत देशात 516 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 6,039 झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या व मृतांचा आकडा वाढत असला तरी देशात कोणत्याही समूह संसर्ग सुरू झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूण चाचण्यांच्या 0.2 टक्के पॉझिटीव्ह

देशात काल घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांपैकी केवळ 0.2 टक्के चाचण्यांचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे, ही खूप आशादायक बाब असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले. सध्या देशात 146 सरकारी तर 67 खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना निदान चाचणीची सुविधा उपलब्ध असून दिवसाला 16 हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. काल करण्यात आलेल्या एकूण 16,002 चाचण्यांपैकी केवळ 0.2 टक्के चाचण्यांचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पीपीईची उपलब्धता दुपटीने वाढवली, 49 हजार व्हेंटीलेंटर्सची खरेदी

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिका यांना कोरोनाची बाधा होऊ म्हणून आवश्यक असणारे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) उत्पादनाची क्षमता आपण गेल्या दोन महिन्यांत दुपटीने वाढली आहे. देशात आज 39 पीपीई उत्पादक आहेत. केंद्राने राज्याने 20 लाख मास्क्सचा पुरवठा केला आहे. नवीन 49 हजार व्हेंटीलेंटर्स खरेदी करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी 15,000 कोटींचे पॅकेज

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तातडीची उपाययोजना व आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य मंत्रालयाने 15,000 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज उपलब्ध करून दिले आहे. या पॅकेजमधून राज्यांना वैद्यकीय पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे, कोविड-19 साठी स्वतंत्र रुग्णालये उभारणे, पीपीईसारखी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदी कारणांसाठी हा निधी वापरण्यात येत आहे.

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा भारतात पुरेसा साठी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे मलेरियावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधी गोळ्यांची मागणी केली होती. त्यावरून भारतात गरज असताना अमेरिकेला त्या गोळ्या पाठवाव्यात का, यावरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांचा भारतात पुरेसा साठा आहे. भारताला साधारणतः एक कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांची गरज असताना भारतात तीन कोटींपेक्षा अधिक गोळ्या उपलब्ध असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

आयसीएमआरचा तसा कोणताही अहवाल नाही – लव अग्रवाल

भारताने लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता तर 15 एप्रिलपर्यंत भारताने कोरोनाबाधितांचा आठ लाखांचा टप्पा ओलांडला असता, अशा अशयाचा कोणताही अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने बनविला नसल्याचे लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील बातम्या निराधार व दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.