Pune : पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या कामगिरीचा कस

शेकडो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज – पुणे शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट जवळच्या झोपडपट्टीत आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास आग लागली. ही आग काही क्षणात पसरत गेली आणि यामध्ये शेकडो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन विभागाला त्यांचे आग विझविण्याचे कौशल्य पणाला लावावे लागले. घटनास्थळापासून सुमारे 500 मीटर लांब बंब थांबवून पाईप अंथरून ही आग विझविण्यात आली.

पुणे अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले , “दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पुणे अग्निशमन विभागाला पाटील इस्टेट जवळ असलेल्या झोपडपट्टीत आग लागली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन बंब घटनास्थळी पाठवून देण्यात आले. मात्र काही वेळेत आगीने उग्र रूप धारण केले. याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली असता तात्काळ आणखी बंब पाठविण्यात आले. त्यासाठी पुणे अग्निशमन विभाग, पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग, खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड, पीएमआरडी आदी ठिकाणावरून मदत मागवून एकूण 20 बंब तात्काळ घटनास्थळी दाखल केले.

आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वाहनांना जाणे अतिशय कठीण होते. अरुंद गल्ल्या, त्यात निमुळते रस्ते, लोकांची उडालेली धावपळ यामध्ये पाईप अंथरण्यास देखील अडचणी आल्या. सुमारे 500 मीटर पाईप अंथरून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु झाले. काही ठिकाणी वरच्या बाजूने जाऊन आगीवर नियंत्र मिळविण्याचे प्रयत्न सुरु झाले. आग विझविण्याचे काम सुरु असताना काही अंतराच्या फरकाने अचानक सहा ते सात सिलेंडरचा स्फोट झाला. आग वाढतच असल्याचे लक्षात येताच महापालिका आणि खाजगी टँकरची मदत घेऊन चारही बाजूने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले.

आगीच्या कारणाबाबत सांगताना रणपिसे म्हणाले, “मागील दोन दिवसांपूर्वी पहाटे तीनच्या सुमारास याच ठिकाणी एक आगीचा प्रकार झाला होता. पुणे अग्निशमन विभागाने दोन बंबांच्या साहाय्याने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्यावेळी देखील आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. आजच्या आगीचे देखील कारण स्पष्ट झाले नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये सुमारे 100 घरे जळून खाक झाली आहेत. गल्ली क्रमांक 1 पासून सुरु झालेली आग गल्ली क्रमांक 8 पर्यंत ही आग पसरत गेली. सुदैवाने अद्याप यामध्ये जीवित हानी झाल्याचे समजले नाही. दुपारी पावणेचारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

मौल्यावान वस्तू आणि सामान वाचविण्यासाठी नागरिकांची धावपळ

अचानक लागलेल्या आगीमुळे स्थानिक नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. कित्येक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला संसार आणि घर डोळ्यादेखत जळत असल्याने काहींना अश्रू अनावर झाले. मात्र घर जळाले असले तरी त्यातील महत्वपूर्ण साहित्य तरी वाचवता येईल, या भावनेने नागरिकांनी मौल्यवान वस्तू आणि सामान घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याची धावपळ केली. काहींनी सोन्या-चांदीचे दागिने, गॅस-सिलेंडर, टीव्ही, कपडे यांसारखे साहित्य घेऊन सर्वजण सुरक्षित ठिकाणी पोहोचले. काही नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत केली. काहींनी पत्र्याच्या घरावरून जाऊन लाकडी वासे, प्लास्टिक टाक्या यांसारख्या जळणा-या वस्तू बाजूला केल्या. काही नागिरकांनी पाईप ओढून पत्रे काढण्यास देखील मदत केली. दरम्यान आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आत जाण्यासाठी तर आपला जीव मुठीत घेऊन तसेच मौल्यवान साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिक असे सगळेच धावपळ करीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.