Pune : सेना-भाजपने मित्रपक्षांचा सन्मान करावा -रामदास आठवले

दक्षिण मध्य, ईशान्य मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची सूचना; आम्हाला दुर्लक्षित कराल, तर आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करू.

एमपीसी न्यूज – “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली ही चांगली बाब आहे. त्यासाठी मीही प्रयत्न करीत होतोच. परंतु, युती झाल्यावर सेना-भाजपने मित्र पक्षांना डावलले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मदतीशिवाय युतीला यश मिळणार नाही. माझ्यामागे समाजातील मोठी ताकद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. याचा अर्थ सेना-भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडून द्यावे, असा नाही. आम्हाला दुर्लक्षित कराल, तर आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करू. त्यामुळे सेना-भाजपने सामंजस्याची भूमिका घेत मित्र पक्षांचा सन्मान करावा,” अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

  • नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, संगीता आठवले, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण यांच्यासह शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले, “आम्ही बरोबर असूनही आम्हाला विचारात न घेणे योग्य नाही. देशहितासाठी मोदींच्या पाठीशी राहणे ही आमची भूमिका आहे. पण सगळ्या गोष्टी परस्पर होत असतील, तर आम्हाला विचार करावा लागेल. दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेसाठी आम्ही मागणी करीत आहोत. ईशान्य मुंबईही चालेल. पण युतीने आम्हाला लोकसभेसाठी किमान एक आणि विधानसभेसाठी सात-आठ जागा सोडाव्यात. गेली साडेचार वर्ष शिवसेना भाजपविरोधात वक्तव्य करीत आहे. तरीदेखील भाजपने त्यांना जवळ केले. आम्ही वेळोवेळी साथ देऊनही आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत होणाऱ्या रिपब्लिकन मेळाव्यात आमची ताकद दाखवून देऊ. तसेच महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांची भेट घेऊन मित्र पक्षांसाठी जागा मागणार आहोत. त्यासाठी अमित शहा यांचीही भेट घेणार आहोत.”

  • मी सरळ मनाचा माणूस असल्याचे सांगून आठवले म्हणाले, “माझ्याशी कुणी वाकडे वागले, तर मीही वाकडा आहे. शरद पवार यांचा मी चांगला मित्र होतो. पण आता मी नरेंद्र मोदी यांचा मित्र आहे. शरद पवार, छगन भुजबळ यांच्याकडून भेटीचे निमंत्रणे येत आहेत. पण, भाजप मित्रपक्षांना न्याय देईल, असे वाटते. राज्यातील अनेक मतदारसंघात आमची ताकद आहे. तेथे युतीला फायदा होऊ शकतो. त्यामुळे सेना भाजपने वाकड्यात न घुसत आम्हाला सन्मान द्यावा. रिपब्लिकन पक्षाची ताकद मागे उभी केली, तर देशात आणि राज्यात युतीचे सरकार निश्चितपणे येईल.”

पुलवामा हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी अशा पद्धतीची शंका घेणे योग्य नाही. दहशतवाद आणि पाकिस्तानशी लढा देऊन देशाचे रक्षण करणे महत्वाचे आहे. माझी महार बटालियन सीमेवर जाऊन लढायला तयार आहे. हार्टअटक येऊन मरण येण्यापेक्षा वीरमरण येणे कधीही चांगले आहे. वेळप्रसंगी युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. तसेच दहशतवादी अड्डे उध्वस्त केले पाहिजे, असेही आठवले यांनी नमूद केले.

  • रिपब्लिकन पक्षाचा २२ मार्चला  मेळावा
    आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचा मेळावा पिंपरीतील एचए मैदानावर होणार आहे. हा मेळावा २२ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, निवडणुकीतील पुढची दिशा ठरविण्यासाठी यामध्ये चर्चा होणार आहे, असेही आठवले यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.