Pune : पुण्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी : जगदीश मुळीक

शहरातील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते शुक्रवारी राज्यसरकारविरोधात आंदोलन करणार

एमपीसी न्यूज – कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. २२ मे) सकाळी दहा वाजता भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

जगदीश मुळीक म्हणाले, ‘शहरातील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते आपआपल्या घराच्या दारात उभे राहून राज्य शासनाचा निषेध करणारे फलक प्रदर्शित करणार आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन केले जाणार आहे.

कोरोनाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आपत्कालिन व्यवस्थेत मदत आणि विविध प्रकारचे सेवा कार्य करीत आहेत. कोरोना रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भाजपची भूमिका आहे. हे सहकार्य यापुढे ही कायम राहील.

परंतु, राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, पुण्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहेत. या बेजबाबदारपणाकडे शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा हेतू असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

पुण्यातील स्थितीचे गांर्भीर्य विषद करताना मुळीक म्हणाले, ‘ससून सर्वोपचार रूग्णालयात कालपर्यंत ४६९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत दाखल केलेल्या रुग्णांपैकी ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच ससूनमध्ये दाखल झालेल्या ४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे.

उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, कर्नाटक या देशातील काही मोठ्या राज्यातील मृत झालेल्या व्यक्तिंच्या संख्येपेक्षा ससूनमधील मृतांची संख्या खूप मोठी आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाणही मोठे आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते त्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.