Pune : शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार

एमपीसी न्यूज- पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी यांच्याद्वारे गुणवंत शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, उपक्रमशील शाळा गौरव, सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे यांच्या हस्ते 60 शिक्षकांना, शाळांना पुरस्कार वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चे अध्यक्ष विजय बहाळकर अध्यक्षस्थानी होते.

विजय बहाळकर म्हणाले, “राज्यसरकार बदलले आणि शिक्षकांच्या समस्या सुटतील, असा विश्वास निर्माण झाला, आहे. शिक्षक हा मुख्य स्तंभ आहे. संविधानाने दिलेले सर्व हक्क बजावण्याची, कर्तव्ये करण्याची प्रेरणा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. वेळेवर आणि सर्वांना सारखे वेतन, बोनस, मुलांना मोफत शिक्षण, सेवा शाश्वती या गोष्टी पूर्वी शिक्षकांना मिळत होत्या.आता त्या मिळत नाहीत”अशी खंत बहाळकर यांनी व्यक्त केली.

तीन वर्षे काम करूनही शिक्षणसेवक हे सेवेत कायम होत नाहीत, फक्त 52 टक्के शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पूर्ण पगार मिळतो, त्यामुळे यापुढे शिक्षकांच्या आत्महत्या पाहायला मिळतील, असा धोका आहे. खेड्या पाड्यातील कमी विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होण्याचा धोका आहे. शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केले आहे.अशी टीका देखील बहाळकर यांनी केले.

माजी आमदार काँग्रेस नेत्या कमल व्यवहारे म्हणाल्या,’शिक्षक होण्याची माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली नाही, पण, शिक्षकांचा सत्कार करण्याची संधी मिळाली ही मोठी गोष्ट आहे ”

मोहन जोशी म्हणाले, “मागच्या शासनाच्या काळाप्रमाणे शिक्षण खात्यात विनोद होणार नाहीत. उलटसुलट जी.आर. निघणार नाहीत. काँग्रेसने शिक्षण खाते स्वतःकडे घेतले कारण नवीन उपक्रम राज्यातील शिक्षण क्षेत्रात सुरू करायचे आहेत. शिक्षक लोकशाही आघाडीच्या मागण्यांबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या समवेत बैठक आयोजित केली जाईल”

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ चे अध्यक्ष आणि शिक्षक लोकशाही आघाडी पुरस्कृत शिक्षक मतदार संघातील उमेदवार जी. के. थोरात, उपाध्यक्ष प्रा. हणमंत भोसले, राज मुजावर, गफार सय्यद, शिक्षक लोकशाही आघाडी शहराध्यक्ष सचिन दुर्गाडे, उपाध्यक्ष संजय शिंदे ,जिल्हाध्यक्ष के. एस. ढोमसे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.