Pune : येरवडा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात तात्पुरते कारागृह; जिल्हाधिका-यांचे आदेश

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा यांनी तात्पुरते कारागृह घोषित करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी आदेश देत येरवडा येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तात्पुरते कारागृह करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण राज्यात 3 मे 2020 पर्यंत संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

कोव्हीड-19 या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात नव्याने दाखल होणा-या बंद्यांना तात्पुरते क्वॉरंटाईन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह, प्रेस कॉलनी समोर, येरवडा पुणे-6 या इमारतीला तात्पुरते कारागृह घोषित करण्यात आले आहे.

तसेच या इमारतीत नव्याने दाखल होणा-या बंद्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत अधिग्रहीत करीत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी या तात्पुरत्या कारागृहाच्या सुरक्षेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त 24 तास नेमावा. तात्पुरत्या कारागृहात दैनंदिन कामकाजासाठी एक तुरुंगाधिकारी व एक लिपीक / रक्षक यांची नियुक्ती येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षकांनी करावी, असे आदेशही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.