Pune : केअर टेकर, आशा, नेट केबलचालक यांना ओळखपत्र द्यावे -दीपाली धुमाळ

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, याचा फटका केअर टेकर, आशा, नेट केबलचालकांना बसला आहे. या सर्वांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.

संचारबंदीमुळे पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करताना केअर टेकर, आशा यांना अडचणी येत आहेत. त्यांना पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे ओळखपत्र देण्यात यावे. पुणे शहरातील आयटी कर्मचाऱ्यांना घरीच बसून काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. हे कर्मचारी काम करीत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो.

नेट केबलची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही तात्पुरते ओळखपत्र दिल्यास सर्वांचीच गैरसोय दूर होणार आहे. पुणे महापालिका किंवा पोलीस स्टेशनमधून हे ओळखपत्र देण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी विनंती दीपाली धुमाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.