Pimpri: ‘होम क्वारंटाईन’मध्ये 1276 नागरिक, चार लाख 23 हजार नागरिकांचे सर्वेक्षण

पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा स्थिर

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1 हजार 276 नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये बंधनकारक आहे. तर, महापालिकेने आजपर्यंत चार लाख 22 हजार 794 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात बाधित रुग्णांचा आकडा 12 वर स्थिर आहे. आज (बुधवारी)दोन संशयीतांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत  141 व्यक्तींचे कोरोनासाठी घश्यातील द्रव्यांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 122 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचे 12 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

पाच संशियांना आज (बुधवारी) नविन भोसरी  रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची 244 कर्मचा-यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहे. आजपर्यंत शहरातील चार लाख 22 हजार 794 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, एक हजार 276 व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

या नागरिकांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28  दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. सूचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.  सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील 14 दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा- यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.