Pune: जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1094 तर मृतांची संख्या 67 वर, 153 कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1094 झाली असून मृतांचा आकडा 67 झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 153 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 10 हजार 62 कोरोना निदान चाचण्या झाल्या असून त्यापैकी 9 हजार 816 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत, तर 246 चाचण्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 1,094 पॉझिटीव्ह तर 8,716 अहवाल निगेटीव्ह आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी पुणे महापालिका क्षेत्रात 957, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 78, बारामती जिल्हा रुग्णालय सात, कॅन्टोन्मेंट बोर्ड 20, ग्रामीण भागात हवेली 17, वेल्हा आठ, शिरूर दोन, भोर दोन, जुन्नर एक, मुळशी एक व बारामती एक अशी विभागणी आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 41 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 67 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक मृत्यू बी.जे वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात झाले आहे. या ठिकाणी 48 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. पुणे महापालिकेच्या व शहरातील इतर खासगी रुग्णालयात मिळून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या (सिव्हील सर्जन) कार्यक्षेत्रात तीन व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यातील पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण पुणे शहरात आढळले होते. आता शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक हजारचा टप्पा ओलांडला आहे. मृतांची संख्याही वाढत आहे. पुण्यातील मृत्यूदर हा जागतिक कोरोना मृत्यूदरापेक्षा कमी असला तरी देशाच्या व राज्याच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनाने नेमलेला स्पेशल टास्क फोर्स  हा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असून जिल्ह्यात शासनाने रेड झोन जाहीर केला आहे. कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊन, फिजिकल डिस्टन्सिंग व वैयक्तिक आरोग्याची काळजी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.