Pune : जिल्ह्यात कुठेही संचारबंदी अथवा जमावबंदी नाही- जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज – पुणे शहरासह जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आदेश देण्यात आले आहेत. स्वतंत्रपणे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच कलम 144 (1) नुसार प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणा-यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरासह जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आदेश आहेत. स्वतंत्र 144 चे आदेश नाहीत. कलम 144 (1)  हे प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आहे. त्याची अंमलबजावणी पोलीस करतील.

पुण्यात सध्या कुठेही संचारबंदी किंवा जमावबंदी नाही. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे संपूर्ण पुणे जिल्हयातील सर्व शाळा बंद राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.

यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.