Pune : कोरोना रुग्ण नसलेल्या भागात विविध सवलती : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील ज्या भागांत कोरोनाचे रुग्ण नाही. त्या परिसरात विविध सवलती देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

आजपासून ( सोमवारी) लॉकडाउनचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. पुणे शहरातील ८४ चौरस किमी प्रतिबंधित क्षेत्र कमी करुन ते आता १० चौरस किमीपर्यंत कमी केलं आहे. याचा फायदा प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरच्या भागाला होणार आहे. ज्या भागामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत, तेथे वैयक्तिक स्वरुपाची वाहने नागरिक वापरू शकतील. फोर व्हिलरमध्ये चालकासह मागे दोन व्यक्ती बसून प्रवास करु शकतील. दुचाकीसाठी एकाच व्यक्तीला परवानगी देण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

याशिवाय ई – कॉमर्स, कन्स्ट्रक्शनला सवलत देण्यात आली आहे. रहिवासी क्षेत्रातील वैयक्तिक स्वरुपाची सर्व दुकाने उघडी राहतील. यामध्ये अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली दुकाने असा फरक होणार नाही. पण, लक्ष्मी रोडसारख्या संपूर्ण शॉपिंग एरियामध्ये एका रस्त्यावर पाच अत्यावश्यक वस्तूंची दुकानं चालू राहतील. याचे नियोजन स्थानिक पोलीस करतील. त्यांना महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर मदत करणार आहेत.

तसेच, सार्वजनिक वाहतूक , कॅब, ऑटो रिक्षा व बसेसला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. वाईन शॉपचा अत्यावश्यक नसलेल्या पाच गोष्टींमध्ये समावेश होतो. याबाबत उत्पादन शुल्क अधीक्षक आणि जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. लॉकडाउनमध्ये लोक अजून किती दिवस राहतील. त्यांचा रोजगार आणि गरिबीचा प्रश्न बघितला तर आपल्याला यामध्ये समन्वय ठेवावा लागेल, असेही आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.