Raigad : उन्हाळी शिबिरासाठी गेलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला; सातजण गंभीर

करंजावणेतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची माहिती

एमपीसी न्यूज – राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये 151 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात शिक्षकांसह सातजण गंभीर असून इतरांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली आहे.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात प्राध्यापक गजानन व्हावळ यांनी चार दिवसीय उन्हाळी शिबीराचे आयोजन केलं होतं. शिबिराच्या पहिल्या दिवशी गुंजवणी गावात सर्वजण एकत्र जमले होते. त्यावेळी शेजारच्या झुडुपांमधून मधमाशांनी अचानक या सर्वांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठे पळावं? हे सूचेना.

  • गुंजवणे गावातील ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना स्वत:च्या घरात घेत मधमाशांपासून त्यांची सुटका केली. त्यानंतर काही वेळाने त्यांना गुंजवणे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात उपचारांसाठी नेले. तिथे तहसीलदार आणि पोलिसांनी जखमींना मदत केली. या हल्ल्यात शिक्षकांसह सातजण गंभीर असून इतरांची प्रकृती स्थिर आहे, असे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितले.

या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनातून तीन किलोमीटर अंतरावरील करंजावणे गावी नेले. मात्र, मधमाशांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

  • मधमाशांचा हल्ला सुरु असताना शिक्षिका ज्योती कड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्या स्वत: गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासह अनुष्का रुगे, श्रेयस क्षीरसागर, स्वाती पाटील, ओंकार शेलार, अशोक चव्हाण आणि प्रवीण वराडे हे सात जण गंभीर जखमी आहेत.

टी-शर्टचा वास ठरला हल्ल्याला कारण?
‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ हे नाव छापलेले नवीन भडक केशरी रंगाचे टी-शर्ट घालून विद्यार्थी शिबिराला आले होते. भडक रंग आणि नवीन टी-शर्टला असलेल्या वासामुळे आकर्षित होऊन झाडावरील मधमाशांनी मुलांवर हल्ला चढवल्याची शक्यता आहे. कारण टी-शर्ट न घातलेल्या इतरांवर मधमाशांनी हल्ला केला नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. तसेच जखमी मुलांना वैद्यकीय उपचारांसाठी नेताना जोपर्यंत त्यांचे टी-शर्ट काढले नाहीत, तोपर्यंत मधमाशांनी त्यांची पाठ सोडली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.