Pimpri : ‘मरावे परी, अवयवदान रूपी उरावे’ ही संकल्पना जनमाणसांत रुजविण्याची गरज – डॉ. वैशाली भारंबे

एमपीसी न्यूज – माणसाच्या मृत्युनंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगाचे ठरते. कोणाचेतरी प्राण वाचविण्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे ‘मरावे परी, अवयवदान रूपी उरावे’ ही संकल्पना आता नागरिकांमध्ये रुजवणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत डॉ. वैशाली भारंबे यांनी निगडी येथे गुरुवारी (दि. 2 मे) व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने छत्रपती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. यावेळी मृत्यूपत्र-अवयवदान की देहदान याविषयावर त्या बोलत होत्या. यावेळी योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आप्पाजी सायकर, अड. प्रतिभा दलाल, विनोद बन्सल, माजी उपमहापौर शैलजा मोरे, भास्कर रिकामे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

  • डॉ. वैशाली भारंबे पुढे म्हणाल्या, ” रक्तदान आणि नेत्रदान याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्याचे परिणाम आपल्याला निदर्शनास येत आहेत. आज लोक स्वयंस्फूर्तीने रक्तदान आणि नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घेत असतात. अशीच जनजागृती अवयव दानाबाबत होणे गरजेचे आहे. स्पेन, अमेरिका, हाँगकाँग अवयवदानात बरेच पुढे आहेत. आपला देशसुध्दा या देशांच्या पंक्तीत आला पाहिजे. त्यासाठी अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जेवढी जास्त जनजागृती होईल, तेवढा याचा फायदा लोकांना होणार आहे. माणसाच्या मृत्युनंतर सात अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात. त्यामुळे लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना या जनजागृती अभियानात सहभागी करून घ्यायला पाहिजे. अवयवदान जनजागृती ही केवळ दोन दिवसांची न राहता याबाबत नियमितपणे लोकांना अवगत करणे आवश्यक आहे” असे त्या म्हणाल्या.

मृत्यूपत्राविषयी प्रतिभा दलाल म्हणाल्या, “मृत्यूनंतर सहा तासांत स्किन बँकेशी संपर्क करावा. दोन तासांत स्किन बँकेची टीम घरी पोहोचते, अवघ्या ४५ मिनिटात त्वचा काढली जाते. त्वचा काढलेल्या भागावर मलमपट्टी करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करतात. मृत्यूचा दाखला आवश्यक असतो. मृत्युशय्येवर असताना जर एखाद्या व्यक्तीने देहदानाची इच्छा व्यक्त केली, तरीही देहदान स्वीकारले जाते. फक्त मृताच्या नातेवाईकांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. देहदान जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये करता येते. मृतदेह हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था नातेवाईकांनाच करावी लागते. मतृदेह आणताना ओळखपत्र, नोंदणी केली असल्यास त्याची माहिती, मृत्यूचा दाखला सोबत न्यावा.

  • यावेळी मृत्युपत्राविषयी सविस्तर माहिती एड.प्रतिभा दलाल यांनी दिली. त्या म्हणाल्या, मृत्युपत्रास कोणताही स्टॅम्प लागत नाही. त्यामुळे खरेदी खत, बक्षीसपत्र इत्यादी दस्तांच्या तुलनेत मृत्युपत्र तुलनेने खूपच कमी खर्चाचा दस्त आहे. मृत्युपत्राची नोंदणी करणेही कायद्याने बंधनकारक नाही. मात्र, नोंदणी कायदा, १९०८ मध्ये मृत्युपत्राबद्दल काही विशेष तरतुदी आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याचे मृत्युपत्र हे नोंदणी अधिकाराच्या ताब्यात सीलबंद लखोट्यामध्ये देखील ठेवता येते आणि संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्यातर्फे माहितगार इसमास असे मृत्युपत्र अर्ज करून मागे घेता येते.

मृत्युपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्युपत्रामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे असते. मृत्युपत्र ना बदलता पुरवणी-मृत्युपत्र देखील करता येते आणि त्यास मृत्युपत्राच्याच सर्व कायदेशीर तरतुदी लागू होतात. मृत्युपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्युपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे.

  • मृत्युपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्युपत्रावर सही करणे गरजेचे आहे. अर्थात दोन साक्षीदारांनी एकाच वेळी सही केली पाहिजे असे काही नाही. त्याचप्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हे माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्युपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे, की वयोवृद्ध झाल्याशिवाय मृत्युपत्र करण्याची गरज नाही किंवा मृत्युपत्र केले म्हणजे आपला मृत्यू जवळ आला असे अनेकांना वाटते. मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ अनिश्चित असते. त्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच मृत्युपत्र करणे इष्ट आहे.

कुठल्या दिवशी मृत्युपत्र करावे असाही प्रश्न अनेकांना पडतो. त्याबद्दल कायद्यात कोणतीही तरतूद नाही. उदा. जन्मदिन, लग्नाचा वाढदिवस अशा विशेष दिवशी मृत्युपत्र करणे लक्षात राहू शकते. मृत्युपत्राची अंमलबजावणी करताना एक किंवा अधिक व्यवस्थापक नेमता येतात; मात्र, असे करणे कायद्याने बंधनकारक नाही. व्यवस्थापक नसल्यास कोर्टातून ‘लेटर्स ऑफ अॅडमिन्सट्रेशन’ मिळवता येते.

  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल खैरे यांनी केले. तर परिचय गीता खंडकर यांनी केला. आभार रत्नाकर देव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.