Pimpri News : दररोज पाणी देणे फसवा विषय – आयुक्त राजेश पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करत होतो. त्यावेळी पवना नदीतून 510 एमएलडीच पाणी उचलले जात होते. दिवसाआड पाणीपुरवठा करायला लागल्यापासूनही 510 एमएलडीच पाणी उचलले जाते. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणे हा फसवा विषय असल्याचे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. आंद्रा धरणातून पाणी आणण्यासाठीच्या परवानग्या महापालिकेच्या हातात नाहीत, त्यामुळे आंद्रातून पाणी कधीपर्यंत येईल याचे ‘टाईमलाईन’ सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.

महापालिकेची सर्वसाधारण, स्थायी समितीची सभा आज (बुधवारी) पार पडली. त्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ”महापालिकेने पाणीपुरवठ्याची वेगवेवेळी कामे हाती घेतली आहेत. चिखलीतील जलशुद्धीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जॅकेवल जोडणे, जागा ताब्यात घेणे, एमआयडीसी हद्दीतील जागा घेणे, केबल, पाईपलाईनची निविदा प्रक्रिया राबविली. काही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेरनिविदा काढाव्या लागल्या. परवानग्या वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा प्रकल्प रेंगाळला आहे. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, परवानगीच्या गोष्टी महापालिकेच्या हातात नाहीत. त्यामुळे टाईमलाईन सांगता येत नाही. वाढीव पाणी कधी येईल, याची डेडलाईन देऊ शकत नाही. पाठीमागे दिलेल्या डेडलाईन चुकल्या आहेत. यावेळीही कोणतीही डेडलाईन न देता कामे लवकरात-लवकर पूर्ण करण्यावर भर राहील”.

आयुक्त पाटील म्हणाले, ”आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपेल. चाचणी करणे, पाणी आणून त्याचे वितरण करणे यात काही कालावधी जाईल. वाढीव पाणी आल्यानंतर संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाणार नाही. सुरुवातीला चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून त्या परिसरातील भागात पुरेशा दाबाने पाणीपुरठा केला जाईल. सध्या तिथे दिले जाणारे पाणी दुसरीकडे वळविले जाईल. ज्या भागात कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्या भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. संपूर्ण शहरात टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, दररोज पाणी देण्याचा विषय फसवा आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करताना जेवढे पाणी उचलतो. तेवढेच पाणी दररोज पाणीपुरवठा करतानाही उचलले जाते”.

”पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती रोखणे, अनधिकृत नळजोड अधिकृत करणे. मीटर रिडिंगचे काम करु घेणे, पाण्याचा फेरवापर वाढविणे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी उद्यानाला देणे. प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीला देऊन शुद्ध पाणी त्यांच्याकडून घेतले जाणार आहे. सखल भागात, नवीन भागात जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करुन पाण्याचा प्रश्न पुढील कालावधीत सोडविला जाईल” असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.