Pimpri News : आंबेडकर जयंतीनमित्त महापालिका कर्मचा-यांना यंदा 15 हजार रुपये मिळणार सण अग्रीम

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांना देण्यात येणा-या सण अग्रीममध्ये वाढ करण्यात आली. यापूर्वी 12 हजार 500 रुपये दिले जात होते. त्यात अडीच हजार रुपयांची वाढ केली असून यंदा कर्मचा-यांना 15 हजार रुपये सण अग्रीम मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी, सर्वसाधारण सभेत प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या 23 ऑक्‍टोबर 2018 नुसार 12 हजार 500 रुपये सण अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्या निर्णयानुसार पालिकेच्या पात्र कर्मचा-यांना डॉ. आंबेडकर जयंतीसाठी सण अग्रीम पालिकेकडून मंजूर केले जाते. यंदा त्यामध्ये अडीच हजार रुपयांनी वाढ केली. गेल्या वर्षी मंजूर अग्रीमची संपूर्ण वसुली झाली आहे. त्याच कर्मचा-यांना 15 हजार रुपये सण अग्रीम देण्यात येणार आहे.

ज्या कर्मचा-यांचे ग्रेड वेतन 4 हजार 800 रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा पात्र कर्मचा-यांना या रक्कमेचा लाभ मिळणार आहे. ज्या कर्मचा-यांची महापालिकेत कमीत कमी सहा महिने सेवा झाली आहे. अग्रिमची परतफेड होईपर्यंत कामावर राहण्याची शक्यता आहे. अशा कर्मचा-यांना सण अग्रीम देय राहील. नियमित वेतनश्रेणीत नसलेल्या कर्मचा-यांना नियमित वेतनश्रेणीतील दोन कर्मचारी जामीनदार असणे आवश्यक आहे.

संबंधित कर्मचा-यांची संपूर्ण वसुली न झाल्यास संपूर्ण रक्कम वसुली जामीनदार कर्मचा-यांच्या पगारातून वसुल करण्यात येईल. अग्रीमची वसुली मे 2022 पासून दरमहा 1500 रुपयांप्रमाणे 10 हप्त्यात वसुल करण्यात येणार आहे. अग्रीम अदा करण्यात आलेल्या कर्मचा-यांच्या अग्रीम वसुलीचा हिशोब संबंधित आहारण व वितरण अधिकारी व लेखा विभागाने अद्यायवत ठेवावा, असे आयुक्तांनी विषयपत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.