Pimpri News : महिलेच्या पोटातील महाशिरेच्या कर्करोगाच्या गाठीची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

जगभरात आतापर्यंत अशा केवळ चारशे शस्त्रक्रिया झाल्या आहेत

एमपीसीन्यूज  : पिंपरी  येथील सुप्रसिद्ध डॉ.डी वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे एका महिलेच्या पोटातील महाशिरेच्या कर्करोगाच्या गाठीची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या  यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा कर्करोगाचा धोका पूर्ण पणे टाळला आहे.

35 वर्षे वयाच्या महिलेच्या पोटात गाठ असल्याचे लक्षात येताच पुढील तपासण्या व उपचारांसाठी रुग्णाला पिंपरी  येथील सुप्रसिद्ध डॉ.डी वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले.

आवश्यक त्या चाचण्यांनंतर  ती अतिशय दुर्मिळ ( २ लाखात एक रुग्ण) पोटातील महाशिरेतून निघणारी मांसल   ( Leiomyosarcoma of inferior vena cava) गाठ कर्करोगाची असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची असते आणि शस्त्रक्रिया करणे हाच एक मार्ग रुग्णाला पूर्ण पणे बरा करणार होता. अशा केसमध्ये किमो व रेडिओ थेरपीचा उपयोग होत नाही.

शस्त्रक्रियेदरम्यान ती गाठ महाशिरेपासून निघून पोटात यकृत, किडनी अशा महत्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचली होती. महाशिरेतील प्रचंड रक्तस्त्राव नियंत्रित करत डॉ. समीर गुप्ता, डॉ. पंकज क्षीरसागर, डॉ. संकेत बनकर व डॉ.सुयश अग्रवाल ह्या कॅन्सरसर्जनच्या चमूतर्फे गाठ काढण्यात आली.

गाठीबरोबर महाशिरेचा सुमारे आठ सेमी. लांबीचा तुकडा काढावा लागला. नंतर तो भाग कृत्रिम रक्तवाहिनीने (PTFA graft) जोडण्यात व किडनीच्या रक्तवाहिनीला पुनर्स्थापित करण्यात व्हॅसक्यूलर सर्जन डॉ. हर्षवर्धन ओक व डॉ. नुपूर सरकार ह्यांना यश आले. सुमारे दहा तास चाललेल्या ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला तेवढ्याच शिताफीने डॉ. स्मिता जोशी ह्यांच्या टीमने भूल दिली. पेशंटला नंतर चार दिवस ICU मध्ये ठेवण्यात आले होते.

गाठीचे निदान करण्यासाठी रेडिओलॉजीचे विभागप्रमुख डॉ. राजेश कुबेर व सहकारी ह्यांची मोलाची मदत झाली तसेच गाठीची तपासणी पॅथॉलॉजी विभागात डॉ. चारुशीला गोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या  शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मदत लाभली असून या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा कर्करोगाचा धोका पूर्ण पणे टाळला आहे.  या रुग्णाला घरी सोडण्यात आले तेव्हा रुग्ण व नातेवाईक खूप भावनिक झाले होते.

इतक्या जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया खूप दुर्मिळ असून जगभरात आतापर्यंत अशा केवळ चारशे शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही शस्त्रक्रिया अतिशय कमी खर्चात १००% यशस्वी केल्याबद्दल जगभरातून रुग्णालयाचे व डॉक्टरांचे कौतुक होत आहे.  ह्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयाचा नावलौकिक वाढला असून  कॅन्सर रुग्णांना वाजवी खर्चात उपलब्ध असणारा एक आशेचा किरण लाभला आहे.

कुलपती डॉ. पी.डी. पाटील , उपकुलपती डॉ.भाग्यश्री पाटील , विश्वस्त डॉ. यशराज पाटील,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजीत सिंग व अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर  यांच्या  सहकार्य व मार्गदर्शनामुळे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात अनेक कॅन्सर शस्त्रक्रिया होत असून हा रुग्णसेवेचा वसा पुढेही असाच चालू राहील, अशी हमी कॅन्सर सर्जरी विभागप्रमुख डॉ. समीर गुप्ता ह्यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.