_MPC_DIR_MPU_III

Ravet : वयाची चाळीशी गाठलेली बहीण झाली भावाला ‘नकोशी’; सहगामी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘ती’चे महिला आश्रमात पुनर्वसन

एमपीसी न्यूज – जीवनात येणा-या अनुभवांमधून माणूस प्रगल्भ बनतो. पण, हे अनुभव रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी दिले, तर मात्र, काळीज पिळवटून जातं. नातेसंबंध आपल्या लोकांना सावरण्यासाठी असतात. ज्या-ज्या वेळी गरज पडेल त्या-त्या वेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आपल्या लोकांकडून अपेक्षा असते. आपली माणसं जेंव्हा साथ सोडतात तेंव्हा समाजातील सहृदय असलेली माणसं स्वीकार करतात. अशाच एका भावाने नकोशा झालेल्या बहिणीला रावेत येथील सहगामी फाउंडेशनच्या महिलांनी महिला आश्रमात पाठवले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

वार गुरुवार, वेळ संध्याकाळी सात आठ वाजता सहगामी फाउंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवार यांना त्यांचे सहकारी लक्ष्मण निकाळजे यांचा फोन आला. रावेत येथील आदर्श नगर परिसरात रस्त्यावर राहणा-या एका महिलेवर काही नराधमांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे, असे निकाळजे यांनी सांगितले. फोन ठेवताच प्राजक्ता यांच्यासोबत केतकी नायडू, सोनू शेख यांनी आदर्श नगर परिसरात धाव घेतली. विजूबाई ही चाळिशीतील एक महिला एका दुकानासमोर सुन्न होऊन बसली होती.

विजूबाई रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली राहत होती. तिने तिचा चक्क संसार सुद्धा थाटला होता. दिवसभर परिसरात फिरायचे. कोणी काही देईल ते खायचे आणि रात्री झाडाखाली येऊन झोपायचे, असा विजूबाईचा मागील अडीच महिन्यांपासून दिनक्रम होता. शांत, भोळसर महिला असल्याने परिसरातील नागरिकांना तिचा त्रास नव्हता. विशेषतः नागरिकांना तिचा लळा लागला होता. एका सद्गृहस्थाने तिला एक लोखंडी पेटी दिली होती. त्या पेटीमध्ये विजूबाई कोणी काही देईल ते ठेवायची. ती पेटी म्हणजेच तिचा संसार होता.

_MPC_DIR_MPU_II

प्राजक्ता यांनी विजूबाईला तिच्याबद्दल विचारले. ‘मागील काही महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले. त्यापूर्वी वडील वारलेले. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ती भावाकडे राहू लागली. काही दिवसांनी भावाला तिला सांभाळण्याचा कंटाळा आला. एके दिवशी चक्क भावानेच तिला रावेत येथे आणून सोडले.’ एवढेच तिला काय ते आठवते. तिचे लग्न झालेले नाही. त्यामुळे सासरच्यांच्या त्रासाचा प्रश्नच नाही. चाळिशीतील विजूबाई आदर्शनगरमध्ये फिरू लागली. मिळेल ते खाऊन एका भाजीच्या दुकानाशेजारी झोपू लागली. पण त्या दुकानाच्या डागडुजीचे काम सुरु झाले आणि विजूबाईची झोपण्याची जागा गेली. त्यानंतर तिने फांद्या जमिनीपर्यंत टेकलेल्या झाडाचा आसरा घेतला.

बुधवारी रात्री एका नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण विजूबाईने प्रतिकार करून नराधमाला पळवून लावले. जाताना नराधमाने पुन्हा येण्याची धमकी दिली. विजूबाईने हा प्रकार जमलेल्या नागरिकांना सांगितला. त्यानुसार, परिसरातील महिलांनी दुस-या दिवशी तो नराधम आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पण तोपर्यंत प्राजक्ता यांनी घटनास्थळी धाव घेतली. विजूबाईचे एखाद्या महिला आश्रमात पुनर्वसन करणे आवश्यक होते. तिला विचारले असता तिने तात्काळ त्यासाठी संमती दिली.

‘मला कुठेही न्या. पण सुरक्षित ठिकाणी न्या. मी पडेल ते काम करायला तयार आहे.’ असे विजूबाईने प्राजक्ता यांना सांगितले. त्यानुसार, मोशी येथील ज्योती पठानिया यांच्या चैतन्य महिला मंडळ या आश्रमाशी संपर्क केला. ज्योती पठानिया यांनी त्यासाठी संमती दिली. विजूबाईची पाठवणी करण्यासाठी परिसरातील महिलांनी तयारी केली. नागरिकांनी दिलेल्या सामानाने तिची पत्र्याची पेटी भरून दिली आणि लगेच रुग्णवाहिकेतून विजूबाईला आश्रमात नेण्यात आले. ज्योती पठानिया यांनी विजूबाईसाठी गरमागरम खिचडी बनवून ठेवली.

विजूबाईने आश्रमात पोहोचताच खिचडीवर ताव मारला. ज्योती पठानिया यांनी विजूबाईचे स्वागत केले. प्राजक्ता यांनी विजूबाईच्या आश्रमातील प्रवेशाची प्रकिया पूर्ण केली आणि जड अंतःकरणाने तिचा निरोप घेतला. आश्रमात पोहोचल्यानंतर विजूबाईच्या चेह-यावर सुरक्षिततेचे समाधान होते. रक्ताची नसली तरी त्याहून अधिक प्रिय झालेली माणसं तिच्या सोबत होती. त्यामुळे ती भारावून गेली होती.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.