Pune : रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन

पुण्यात उद्या अंत्यसंस्कार; सरसंघचालक डॉ. भागवत उपस्थित राहणार

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ ) यांचे आज (ता. २४ ) पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. २५ )  सकाळी पुण्यात (Pune) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dighi : टाटा कम्युनिकेशन कंपनीची केबल चोरीला

देवी यांच्या निधनावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शोक व्यक्त केला आहे. “मदनदासजी यांच्या जाण्याने आमचा ज्येष्ठ सहकारी गमावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शारीरिक अस्वास्थ्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता.

 

आज पहाटे त्यांच्या या संघर्षाचा आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद अंत झाला आहे. मदनदास हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी परिषदेचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वर्गीय  यशवंतराव केळकर यांच्या सहवासात त्यांनी संघटनकलेच्या गुणवत्तेला परिपूर्ण रूप दिले,” असे सरसंघचालकांनी त्यांच्या   शोकसंदेशात म्हटले आहे.

 

मदनदास देवी यांचा जन्म ९ जुलै १९४२ या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे झाला. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) त्यांनी १९५९ मध्ये प्रवेश घेतला. एम.कॉम नंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले.

 

पुण्यात (Pune) शिक्षण घेत असतानाच वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा  संबंध आला. मदनदास देवी यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला.

 

ते १९६९ पासून संघ प्रचारक होते. अभाविपमध्ये त्यांनी १९७५ पासून कामास सुरूवात केली. तेथे ते विभाग, प्रदेश व क्षेत्रीय अशा जबाबदाऱ्यांनंतर त्यांनी अ.भा. संघटन मंत्री म्हणूनही काम केले. महाविद्यालय- शहर पातळीवर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत त्यांनी संघटनकार्याचा पाया रचला. अनेक समर्पित कार्यकर्त्यांच्या पिढ्या त्यांनी घडविल्या.

 

उद्या पुण्यात अंत्यसंस्कार

मदनदासदेवी यांचे पार्थिव आज रात्रीपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. मंगळवारी सकाळी ९  वाजल्यापासून  ११ वाजेपर्यंत पार्थिव  मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर सकाळी ११.३० वाजता  वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरसंघचालक मा.  डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यावेळी उपस्थित राहतील.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदनदास देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्री. मदनदास देवी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले.

 

त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ठ संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले. दुःखाच्या याप्रसंगी ईश्वर सर्व स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो, असे पंतप्रधान मोदी यानी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.