Pune News : पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने स्थिर का, याबाबत संशोधन व्हावे – आमदार शिरोळे

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा गेले काही दिवस सातत्याने स्थिर राहिला आहे. यावर संशोधन व्हायला हवे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक झाली. या बैठकीत कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाला. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट घटत असल्याने कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्याची मागणी मी गेले महिनाभर करत होतो. गेल्या आठवड्यात मुंबई, ठाणे येथील निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र पुण्यात ते कायम ठेवले, असा पक्षपात का? असा प्रश्नही मी विचारला होता. आता निर्बंध शिथिल झाल्याने शहराच्या अर्थचक्राला गती मिळेल अशी आशा आहे. पुणेकरांनीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता कोरोना साथीसंदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन आमदार शिरोळे यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्क्यांवरून खाली म्हणजे 5.86 इतका घटला आहे. आसपासच्या जिल्ह्यातीलही पॉझिटिव्हिटी रेट घटतो आहे. मात्र, पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या आसपास बराच काळ स्थिर आहे. तो अजून घटत का नाही? यावर संशोधन व्हावे अशी मागणी आमदार शिरोळे यांनी बैठकीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.