Pimpri: हॉर्न विरहित शहरासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा हॉर्न नॉट ओके प्लिज उपक्रम (व्हिडीआे)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला ध्वनी प्रदूषणातून विशेषतः हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजातून मुक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीच्या पुढाकारातून आणि पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक विभाग, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डी वाय पाटील, राजा शिवछत्रपती शिवाजी विद्यालय तळवडे यांच्या सहकार्याने हॉर्न नॉट ओके प्लिज उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम शहरातील प्रमुख पाच चौकांमध्ये राबविला असून प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांनी पोस्टर, स्टिकर आणि वाहन चालकांशी संवाद साधून हॉर्न न वाजविण्याबाबत जनजागृती केली.

हॉर्न नॉट ओके प्लिज या उपक्रमाची सुरुवात निगडी मधील लोकमान्य टिळक चौकामध्ये झाली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर, मोटार वाहन निरीक्षक उदय इंगळे, पोलीस निरीक्षक एन के घोगरे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, उपाध्यक्ष विजय काळभोर, हरविंदर दुल्लत, विजय रमाणी, साधना काळभोर, भूषण कुलकर्णी, कमलजित दुल्लत आदी उपस्थित होते.

सुभाष जयसिंघानी म्हणाले, “हॉर्न नॉट ओके प्लिज उपक्रम टिळक चौक निगडी, संभाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी, हँगिंग ब्रिजजवळ भोंडवे चौक आणि त्रिवेणी नगर चौक या ठिकाणी राबविण्यात आला. सर्व वाहनांवर हॉर्न न वाजविण्याबाबत स्टिकर लावण्यात आले. नागरिकांशी संवाद साधून ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगण्यात आले. हॉर्नचा वापर कमी करून तो पूर्णपणे टाळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत”

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले, “हॉर्न वाजविणे वाजविणा-यासह ऐकणा-यासाठी सुद्धा धोकादायक आहे. त्यामुळे हृदयविकार, मानसिक तणाव, नैराश्य अशा प्रकारचे गंभीर आजार होत आहेत. तसेच अचानक वाजलेल्या कर्णकर्कश हॉर्नमुळे अपघात सदृश परिस्थिती  निर्माण होते. हॉर्न अतिआवश्यक ठिकाणी वाजवावे. त्यासाठी हॉर्नचे महत्व आपण ओळखायला हवे. पिंपरी-चिंचवड शहराला हॉर्नमुक्त करण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे. यापुढील काळात शहरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.