Pimpri : मधुमेह जनजागृतीबाबत निगडित वॉकेथॉन; चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज – मधुमेह ही देशाला भेडसावणारी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मधुमेह होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि मधुमेह झाल्यानंतर कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे, याबाबत जनजागृती होणे फार आवश्यक आहे. हाच धागा पकडून रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, रोटरी क्लब ऑफ निगडी आणि सुप्रीम क्लीनिक आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाॅकेथाॅन 2019’ हा उपक्रम घेण्यात आला. जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाच्या जनजागृतीसाठी बालगोपाळांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंतच्या वयोगटातील हजारो नागरिकांनी वॉक केला.

‘वाॅकेथाॅन 2019’चे उदघाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर आणि व्याख्याते मकरंद टिल्लू यांच्या हस्ते झाले. पावित्र्य आणि शांततेचे प्रतीक असलेल्या पांढ-या आणि अथांगतेचे प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचे फुगे आकाशात सोडून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, रोटरी क्लब ऑफ निगडीचे विजय काळभोर, वैशाली शहा, वैजयंती आचार्य, सतीश आचार्य, दीपा लंके, संजय सिंघानी, डॉ. रवींद्र कदम आदी उपस्थित होते.

निगडी प्राधिकरण मधील सावरकर भवन येथून ‘वाॅकेथाॅन 2019’ ला सुरुवात झाली. पहाटे सहाच्या अगोदरच सर्वजण वॉकेथॉनसाठी सज्ज झाले. चार ते पाच वर्ष वयाच्या मुलांपासून ते 90 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सुमारे दोन हजार जणांनी यामध्ये सहभाग घेतला. मकरंद टिल्लू यांच्या हास्ययोगाने कार्यक्रमास सुरुवात झाली. ‘रक्तशर्करा ठेवा नियंत्रणात, निरोगी राहील हृदय आपोआप’, ‘चाला तीस मिनिटे रोज भरभर, निरोगी रहा आयुष्यभर’ असे फलक घेऊन मुलांनी जनजागृती केली.

वीर सावरकर सदन येथून वॉकेथॉनला सुरुवात झाली. त्यानंतर काचघर चौक, भेळ चौक, प्राधिकरण पोस्ट ऑफिस मार्गे सावरकर सदन असे चार किलोमीटर अंतर सर्वजण चालले. सुप्रीम क्लिनिकचे डॉ. विनायक हराळे, डॉ. मानसी हराळे, डॉ. अअॅलन पीटर, समुपदेशक भाग्यश्री पंडित, आहारतज्ञ शितल तांबे यांनी मधुमेह जनजागृतीबाबत एक पथनाट्य सादर केले. सावरकर भवन येथे मधुमेह प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी रक्तशर्करा आणि रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like