RTO News : आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या पारदर्शक बदल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

एमपीसी न्यूज – परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून (RTO News ) ऑनलाईन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज (बुधवारी, दि. 18) सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरम्यान, आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते 166 मोटार वाहन निरीक्षक आणि 314 सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. 166 मोटार वाहन निरिक्षकांपैकी 91 टक्के जणांना तर 314 सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी 97 टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे.

परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्ये, विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार (RTO News ) विभागाने ही प्रणाली विकसीत केली असून त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बैठकीत केले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अतिरीक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

BJP : फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभेच्या संयोजकपदी रवींद्र प्रभुणे, नंदू भोगले यांची नियुक्ती

परिवहन विभागाच्या काही विभागातील कार्यालांमध्ये निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे रिक्त होती. आता या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभर सर्वत्र समप्रमाणात पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमाचे ठिकाण ऑनलाईन मागविण्यात आले आहेत.

त्यानुसार यावर्षी बदलीपात्र अधिकाऱ्यांमध्ये 166 मोटार वाहन निरीक्षक आणि 314 सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश होता. त्यांची ऑनलाईन पद्धतीने अंतिम यादी आजच्या या बैठकीत तयार करण्यात आली.

166 मोटार वाहन निरीक्षकांपैकी 100 जणांना प्रथम पसंती क्रमानुसार, 35 जणांना द्वितीय पसंती क्रमानुसार, 15 जणांना तृतीय पसंती क्रमानुसार तर 16 जणांना रॅण्डमली बदली देण्यात आली आहे.

या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. त्यासाठी अधिक तीव्र उपाययोजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबवू नका. त्यांची वेगमर्यादा निश्चित करा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांसोबत विशेष परिवहन अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही यावेळी (RTO News ) मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.