Sangavi News: सांगवी-किवळे रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 21 कोटींचा खर्च; स्थायीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – सांगवी ते किवळे रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे आणि अनुषांगिक कामे करण्यात येणार आहेत. सहा महिन्यात हे काम केले जाणार असून त्यासाठी येणा-या 21 कोटी 40 लाख 12 हजार रुपये खर्चाला स्थायी समितीच्या सभेत आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. दरम्यान, हा रस्ता सुस्थितीत असतानाही निवडणूक फंडासाठी काम केले जात असल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सांगवी ते किवळे रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे आणि अनुषांगिक कामे करण्यासाठी निविदा मागविली होती. निविदेची रक्कम 30 कोटी 94 लाख 95 हजार रुपये इतकी होती. या निविदाप्रक्रियेत आर.एम.के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (31.76 टक्के), अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (27.99 टक्के) आणि श्री गणेशा कन्स्ट्रक्शन यांनी (27.39 टक्के) सहभाग घेतला.

त्यापैकी आर.एम.के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 31.76 टक्के कमी दराची निविदा आहे. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी 1 जानेवारी 2022 रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्चेसह 21 कोटी 40 लाख 12 हजार रुपयात काम करुन घेतले जाणार आहे. 6 महिन्यात काम पूर्ण केले जाणार आहे. या ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.