Pune Crime News : पुण्यातही बुली बाईसारखं प्रकरण? लहान मुली आणि महिलांचे फोटो अश्लीलरित्या केले व्हायरल, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – पुण्यातील खडकी परिसरात देखील बुली बाईसारखं प्रकरण घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खडकी परिसरात राहणाऱ्या महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी खडकी पोलीसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

खडकीत राहत असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने हे कृत्य केले असून 9 जानेवारी रोजी हा सगळा प्रक्रार घडला आहे. खडकी पोलीस स्टेशनमध्ये 10 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपीने राहत्या परिसरातच महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये काढले आणि नंतर त्याला अश्लील रित्या एडिट करत ते सोशल मीडिया वर व्हायरल केले. दरम्यान हा तरुण 2019 पासून हे कृत्य करत असल्याचं उघड झालं आहे.

या आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल हँडसेटसह त्याने अनेक वेगळे – वेगळे मोबाईल वापरल्याचे देखील उघड झाले आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू असून आतापर्यंतच्या तपासात त्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओ मध्ये 18 वर्षा खालील 4 मुलींची तर तीन महिलांची नावे समोर आली आहेत.

इतर देशांचे व्हाट्सअप ग्रुप – 

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या व्हाॅट्सअॅप मध्ये ब्राझील, पाकिस्तान या देशांसह अन्य अनेक देशांचे व्हाॅट्सअप ग्रुप बनलेले आहेत आणि याच गृपवर त्याने हे सारे फोटो आणि व्हिडिओ पाठवले असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी –

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर 354 क आणि 469 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती खडकी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.