Sangvi : डंपरच्या धडकेत 13 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

हा अपघात मंगळवारी (दि. 4) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील मोरया पार्कजवळ झाला. : 13-year-old Chimukali dies after being hit by a dumper

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेली 13 वर्षीय मुलगी खाली पडली. तिच्या अंगावरून डंपरचे मागचे चाक गेल्याने  तिचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 4) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील मोरया पार्कजवळ झाला.

विभूती संजय साफरिया (वय 13, रा. चिखली), असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. गणेश राजाराम वगरे (वय 27 रा. थेरगाव) असे डंपर चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साफरीया व त्यांची मुलगी विभूती हे दोघे पिंपळे गुरव येथील मोरया पार्क येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास संजय साफरीया व विभूती साफरिया दुचाकीवरून चिखली येथे जात होते.

त्यावेळी मोरया पार्क येथील मुख्य रस्त्यावर डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर मागे बसलेली विभूती खाली पडली. डंपरचे मागचे चाक तिच्या अंगावरून गेले. त्यामुळे विभूतीचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली.

त्यानंतर मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.