Sangvi : औंध मिलिटरी कॅम्पमध्ये दारू पिण्यास नकार दिल्याने जवानाला मारहाण

एमपीसी न्यूज – औंध मिलिटरी कॅम्पमध्ये एका जवानाने दारू पिण्यास नकार दिल्याने त्याच्या चार सहकारी जवानांनी त्याला मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 3 जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास औंध मिलिटरी स्टेशन येथे घडली.

रमेश मोहनराव विष्णोई (वय 26) असे जखमी जवानाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मेजर सोहम सिंग बिस्ट, लेफ्टनंट महिपलसिंग खाती, सुभेदार सुभाष चंद, नाईक सुभेदार विकास मंडल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रमेश यांना औंध मिलिटरी स्टेशनमधील एफटीएन बॅरॅक रुम नंबर 12 मध्ये बोलावले. त्यांना दारू पिण्याचा आग्रह केला. त्यासाठी रमेश यांनी नकार दिला. यावरून चौघांनी रमेश यांच्या तोंडात जबरदस्तीने दारू ओतली. मेजर बिस्ट याने लाकडी दांडक्याने मारले.

तसेच सर्वांनी मिळून लथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी रमेश यांच्या तोंडात कापडाचा बोळा तोंडात घालून लाकडाने व लोखंडी रॉडने मारहाण करत रमेश यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.