Sangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत फ्लॅट अधिकृत करणा-याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – अनधिकृत फ्लॅटची कागदपत्रे बनावट तयार करून तो अधिकृत असल्याचे भासवून इसमाची फसवणूक केली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 एप्रिल 2011 ते 1 ऑगस्ट 2019 या कालावधीत शितोळेनगर जुनी सांगवी येथे घडली.

संजय जयराम जाधव (वय 50, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ज्ञानेश्वर आदिकराव साबळे (वय 50, रा. शिंदे वस्ती, रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जाधव 2011 पासून शितोळेनगर, जुनी सांगवी मधील गजानन वास्तू या इमारतीत फ्लॅट क्रमांक पाचमध्ये राहत होते. हा फ्लॅट जाधव यांनी साबळे यांच्याकडून खरेदी केला. हा फ्लॅट अनधिकृत होता. मात्र तो अधिकृत असल्याचे रेग्युलायझेशन सर्टिफिकेट साबळे याने जाधव यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी फ्लॅट खरेदी केला. मात्र, तो अनधिकृत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शितोळेनगर मधील फ्लॅट सोडून सिंहगड रोड येथे राहण्यास गेले. याबाबत जाधव यांनी साबळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.