Sangvi : शाळेत सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – मुलीला शाळेत सोडतो, असे सांगत दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला शनिवारवाडा येथे नेले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले. ही घटना गुरुवारी (दि. 3) पिंपळे निलख बस स्टॉप ते शनिवारवाडा दरम्यानच्या प्रवासात टेम्पोमध्ये घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 50 वर्षीय वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शौकत अजमेर शेख (वय 19) आणि अमोल चंद्रकांत इंगवले (वय 21, रा. पिंपळे निलख) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी तयार झाली. त्यावेळी आरोपींनी तिच्या घरच्यांना ते शाळेत सोडतील, असे सांगितले. मुलीचे पालक आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत असल्याने पालकांनी मुलीला त्यांच्यासोबत जाण्यास परवानगी दिली. आरोपींनी तिला टेम्पोमधून शाळेत सोडण्याऐवजी पिंपळे निलख बस स्टॉप वरून शनिवारवाडा येथे नेले. या प्रवासादरम्यान आरोपींनी तिच्याशी शारीरिक लगट करून अश्लील वर्तन केले.

शाळा सुटल्यानंतर मुलगी वेळेत घरी आली नाही. मुलगी उशिरा घरी आल्यानंतर घरच्यांनी तिला उशिरा येण्याचे कारण विचारले असता हा प्रकार समोर आला. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.