Talegaon Dabhade : अतिक्रमण कारवाई बाधितांना बाजार समितीने जागा द्यावी – काँग्रेस

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई बाधित विक्रेते, व्यावसायिक, व्यापारी यांना मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यवसाय परवाना व जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेस (आय) व सहयोगी पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, व्यापारी, व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, ग्राहक, शेतकरी, शेतक-यांना सेवा पुरविणारे सेवा व्यावसायिक, कृषीमाल उत्पादक शेतकरी आपल्याकडे दि 5 ते 12 जानेवारी दरम्यान अर्ज करणार असून आपल्या अधिकारानुसार कायदेशीर व्यवसाय परवाना व जागा उपलब्ध करून द्यावी तसेच आपण मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रेते, व्यापारी, अडते, किरकोळ विक्रेते, ग्राहक व शेतक-यांना सेवा देणारे केंद्र यांचे गाळे अथवा जागा देण्याचा अधिकार हा फक्त बाजार समितीलाच आहे, आणि वीज, पाणी, रस्ता ह्या मुलभूत सोयी देण्याचा अधिकार नगरपरिषदेचा आहे.

व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना अधिकृत परवाना व अधिकृत व्यावसायिक म्हणून मान्यता द्यावी, आणि हंगामी अथवा कायमस्वरूपी जागा द्यावी. आपल्या नियमानुसार त्याचे भाडे देण्यास व्यावसायिक तयार असून कायमस्वरूपी बांधकाम करून गाळे देणार असाल तर त्यासाठी लागणारी अनामत अथवा गाळयाची किंमतही देण्यास भाजीविक्रेते, व्यावसायिक, दलाल, अडते तयार आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भातील छापील अर्ज तळेगाव मध्ये मनजीत हाॅटेल, विनायक मेडिकल स्टोअर (स्टेशन ), बाळू वडेवाले (शिवाजी चौक), उत्तमशेठ ओसवाल- सरस्वती जनरल स्टोअर्स (रेल्वे स्टेशन), सुरेशभाऊ चौधरी- भाजी मार्केट (तळेगाव स्टेशन), अण्णा देशमुख- साईबाबा स्टोअर्स (स्टेशन चौक) या ठिकाणी उपलब्ध आहेत.

सर्व संबंधितांनी 5 ते 12 जानेवारी दरम्यान छापील अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन बाळासाहेब ढोरे, माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, सुरेश चौधरी, यादवेंद्र खळदे, बाळासाहेब काकडे, गणेश खांडगे, चंद्रभान खळदे, अण्णा देशमुख, विशाल दाभाडे, विशाल वाळुंज आदींनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.