Pune : गतविजेत्या एमपी अकादमीसह एसजीपीसी उपांत्य फेरीत

यजमान एसएनबीपी अॅकॅडमीची  संघर्षपूर्ण हार

एमपीसी न्यूज – गतविजेत्या मध्यप्रदेश हॉकी अॅकॅडमी संघाने आपले वर्चस्व कायम राखत एसएनबीपी 16 वर्षांखालील अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यजमान एसएनबीपी अॅकॅडमीचे आव्हान मात्र, उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. 

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या आजच्या सामन्यात एमपी अॅकॅडमी संघाने हॉकी कूर्गचे आव्हान 4-0 असे संपुष्टात आणले. नियोजनपूर्ण आणि वेगवान खेळ करत एमपी संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखले. वेगवान खेळ कत त्यांनी पूर्वार्धातच चारही गोल करून सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. श्रेयस धुपे, शैलेंद्र िसंग, महंमद झैद खान आणि अली अहमद यांनी एमपीकडून गोल केले.

त्यानंतर झालेल्या सामन्यात सेल हॉकी अॅकॅडमी संघाने ऐश बाघ स्पोर्ट सेंटरचा 4-0 अशाच फरकाने पराभव केला. केरोबिन कालरा याने दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने दोन्ही गोल पोनल्टी कॉर्नरवर केले. सेल संघासाठी अन्य दोन गोल मुकेश टेटे आणि नितेश यांनी केले.

एसजीपीसी संघाने यजमान एसएनबीपी संघाचा प्रतिकार संघर्षपूर्ण लढतीत 4-3 असा परतवून लावला. आकाश यादव याने 26व्या मिनिटाला गोल करून एसएनबीपीचे खाते उघडले.पहिल्या अर्ध्या तासातच गोल करून त्यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले होते. ही आघाडी त्यांनी मंध्यतरापर्यंत टिकवून ठेवली.

उत्तरार्धात एसजीपीसी संघाने वेगवान सुरवात करताना पाच मिनिटात दोन गोल करून आघाडी घेतली. सामन्याच्या 38व्या मिनिटाला करणदीप सिंगने पहिला गोल केला. त्यानंतर 42व्या मिनिटाला सरबजिंदर सिंग याने संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 47व्या मिनिटाला शुभम लाहोरिया याने गोल करून एसएनबीपीला बरोबरी साधून  दिली. मात्र,  त्यांचा बरोबरीचा आनंद  फार  काळ टिकला नाही. अमृतपाल सिंगने 51व्या मिनिटाला गोल करून एसजीपीसी संघाला पुन्हा आघाडीवर नेले. अखेरच्या टप्प्यात 57व्या मिनिटाला हरविंदर सिंग याने गोल करून संघाचा  विजय निश्चित केला. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला शुभम  लाहोरिया याने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावून पिछाडी एकने भरून काढली.

अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जय भारत अॅकॅडमी संघाने पिछाडी भरून काढताना नवाल टाटा हॉकी अॅकॅडमीचा 3-1 असा पराभव केला. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिल्यावर उत्तरार्धात सनी, शुभम, अग्यापाल  यांनी गोल केले. पराभूत संघाकडून एकमात्र गोल नविन केरकेटा याने केला.

निकाल – (उपांत्यपूर्व फेरी)

एमपी हॉकी अॅकॅडमी 4 (श्रेयस धुपे 15वे, अली अहमद 16वे, शैलेंद्र सिंग 21वे, महंमद झैद खान 22वे मिनिट) वि.वि. हॉकी कूर्ग 0. मध्यंतर 3-0

सेल हॉकी अॅकॅडमी 4 (मुकेश टेटे 9वे, केरोबिन कालरा 13, 30वे, नितेश 59वे मिनिट) वि.वि. ऐशबाघ स्पोर्टस सेंटर 2 (सद्दाम अहमद 33वे, सौरभ दांडे 56वे मिनिट)

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी), अमृतसर 4 (करणदीप सिंग 38वे, सरबजिंदर सिंग 42वे, अमृतपाल सिंग 51वे, हरविंदर सिंग 57वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी अॅकॅडमी 3 (आकाश यादव 26वे, शुभम लाहोरिया 47, 60वे मिनिट).  मध्यंतर 1-0

जय भारत हॉकी भिवानी, हरियाना 3 (सनी 47वे, शुभम 48वे, अग्यापाल 58वे मिनिट) वि.वि. नवाल टाटा हॉकी अॅकॅडमी 1 (नविन केरकेटा 36वे मिनिट). मध्यंतर 0-0

अशा होतील उपांत्य लढती

एमपी हॉकी अॅकॅडमी विरुद्ध सेल हॉकी अॅकॅडमी (दु. 1 वा.)
एसजीपीसी, अमृतसर विरुद्ध जय भारत हॉकी भिवानी, हरियाना (दु. 3 वा.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.