Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 44 – दुःखी ‘आनंदी’ प्रत्युषा बॅनर्जी

एमपीसी न्यूज : ती अतिशय सुंदर होती, प्रतिभावंत होती, तिच्यात काही तरी (Shapit Gandharva) खास करुन दाखवण्याची धमक होती. अन ते करण्याची इच्छाही. ती त्याच इच्छेला फलद्रुप करण्यासाठी कमी वयात मुंबईत आली. तिने स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर काम मिळवले. सोबत यश आणि पैसाही.

ती यशाच्या शिखरावर आहे असे वाटत असतानाच, तिने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली(?) होती, का ते आजतागायत कोणालाही कळाले नाही.पण एकच कळले की, तिने अतिशय कमी कालावधीत मुंबई नगरीत आपली स्वतःची खास ओळख निर्माण केली होती.

  होय “बालीका वधू” या कलर चित्रवाहिनी वर प्रदर्शित झालेल्या कमालीच्या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली आनंदी म्हणजेच खऱ्या आयुष्यातली प्रत्यूषा बॅनर्जी. हीच या मालिकेतली आजची शापित अप्सरा म्हणजेच,शापित गंधर्व आहे.
झारखंड येथील जमशेदपूर येथे 10 ऑगस्ट 1991 रोजी सोमा आणि शंकर बॅनर्जी यांचे पोटी जन्माला आलेली त्यांची ही लाडकी कन्या.

तिचे वडीलशंकर बॅनर्जी हे तिथले सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते. त्यांची स्वतःची एक एनजीओ आहे.प्रत्यूषाला बालपणापासूनच रुपेरी पडद्याचे आकर्षण होते.तिच्या आईवडिलांनीही तिला यासाठी कायम प्रोत्साहनच दिले.2010 साली म्हणजेच वयाच्या 19 व्या वर्षी आपल्या स्वप्नाला साकार करण्यासाठी तिने मायानगरी मुंबईत पाऊल ठेवले.तिला “रक्तबंधन”नावाची पहिली मालिकाही मिळाली.

त्यानंतर तिला “ये रिष्ता क्या कहलाता है”ही दुसरी मालिका सुद्धा मिळाली. या दोन्ही मालिकेतल्या तिच्या चांगल्या अभिनयाचे कौतूक झाले,अन त्याचे बक्षीस म्हणून तिला मिळाली ती लोकप्रिय असलेल्या”बालिका वधू” या मालिकेतल्या मोठ्या आनंदीची भूमीका.बालवयातील आनंदीची भूमिका “अविका गोर” ने अतिशय लोकप्रिय करुन ठेवली होती, त्याचे कसलेही दडपण न घेता प्रत्यूषाने आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर आपली “आनंदीही”कमालीची लोकप्रिय केली.

Monsoon Trek : पावसाळ्यात ट्रेकला जाताय? तर हा खास लेख तुमच्यासाठी!

महिला वर्गात तर तिची क्रेझ होतीच, पण पुरुष वर्गात सुद्धा ती तितकीच लोकप्रिय होती.कोणाला ती आदर्श मुलगी, कोणाला आदर्श सून म्हणून भावत होती. बघताबघता लोकप्रियतेची सर्व शिखरे तिने ओलांडली आणि छोट्या पडद्यावरची (Shapit Gandharva) ही जणू सुपरस्टार बनली. तीन वर्षे हे पात्र यशस्वीरित्या साकारल्यानंतर तिने ही मालिका अचानक सोडली.

यानंतर तिने “झलक दिखला जा”,”बिग बॉस 7″ आदी लोकप्रिय शो केले, ज्यातूनही तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.”प्यार तुने क्या किया”,”सावधान इंडिया”,”हम है ना”,”इतना करो ना मुझे प्यार”,स्वररागिनी,’ससुराल सिमर का”,”आहट, @हमारी अधुरी कहाणी” ये वादा रहा”पॉवर कपल”आदी मालिकेतही तिने उत्तम काम केले.

बघताबघता तिची लोकप्रियता वाढत होती, ती यशाची एकेक शिखरे पार करत होती, अन अचानक 1 एप्रिल 2016 रोजी तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली, अशी बातमी देशभरातल्या सर्व न्यूज चॅनेल्सवर झळकू लागताच, तिच्या चाहत्यांना एकच धक्का बसला.

ही नक्की आत्महत्या होती की तिचा काही घातपात झाला याबद्दल तेंव्हाही कोणाला काही कळाले नाही अन् आजही त्याबद्दल कोणीही ठामपणे काहीच सांगू शकत नाही. सत्य हेच आहे की वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी टीव्हीच्या रुपेरी पडद्यावर चमकत असलेली ही चांदणी अचानकपणे अन् अकाली लुप्त झाली.

तिच्या पोटात म्हणे गर्भही होता, तिचे प्रेमप्रकरणे, प्रियकर आदी सर्वाना या घटनेने थेट आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. यावर जास्त वादळी (Shapit Gandharva) चर्चा तेव्हा झाली जेव्हा तिच्या आईवडीलांनी तिचा कथित प्रियकर राहुल राज यानेच आपल्या लेकीला मारल्याचा गंभीर आरोप केला.

तो खटला आजही चालू आहे. मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यापारी मकरंद मल्होत्रा, टीव्ही क्षेत्रातला नामवंत चेहरा विकास गुप्ता, आदी नावेही संशयाच्या भोवऱ्यात सापडली. मुंबईत आल्यानंतर तिला मकरंद मल्होत्राने खूप मदत केली. यातून त्यांच्यात प्रेम झाले. पण हे नाते दीर्घकाळ टिकले नाही.

NCP Crisis : पिंपरी चिंचवड, मावळसह तळेगाव अजित पवार गटात तर पुण्यातील नेते अजूनही संभ्रमात!

यानंतर ती राहुल राज सिंगच्या संपर्कात आली. अन दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघेही लग्न करणार अशी आवई उठली होती. असेही म्हटले जाते की, ते लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यातूनच ती गरोदर झाली. यात खरे-खोटे काय ते परमेश्वरालाच माहित पण कुठल्या न कुठल्या कारणाने यशाच्या शिखरावर असलेली ही टीव्हीवरची आनंदी वैयक्तिक आयुष्यात मात्र कमालीची दुःखी होती.

त्रासात होती, हा त्रास तिला इतका असह्य झाला, की तिने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी या त्रासातून मुक्त होण्यासाठी जीव दिला. 1 एप्रिल 2016 रोजी कांदिवली येथील आपल्या सदनिकेमध्ये तिने गळफास घेवून या जगाला अलविदा केला. तिच्या आईवडीलांनी पत्रकार परिषद घेवून तिला राहुल राज सिंगने मारल्याचा आरोप केला, तर राहुलराज सिंगने तिच्या आईवडिलांवर तिच्या छळाचा आरोप करत, त्यांच्या सुखासाठी त्यांनी तिला भरमसाठ कर्ज उचलायला लावले.

ज्याचे हप्ते थकल्याने नैराश्यग्रस्त होवून तिने आत्महत्या केली, असा आरोप केला. अजूनही ही केस कोर्टात सुरुच आहे. लवकरच याचा निकाल लागो आणि किमान मृत्यूनंतर तरी आनंदीला न्याय मिळो, इतकीच परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना..!

-विवेक कुलकर्णी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.