Monsoon Trek : पावसाळ्यात ट्रेकला जाताय? तर हा खास लेख तुमच्यासाठी!

   एमपीसी न्यूज : पावसाला सुरुवात झाली की हिरवाईने (Monsoon Trek) नटलेले डोंगर आणि खळखळणा-या दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. रिमझिम पावसात गड, किल्ले, डोंगर, दऱ्या पालथ्या घालण्याचा अनेकांना छंद असतो. आनंद, उत्साहाच्या भरात पुरेशी तयारी न करता अनेकजण ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पण, योग्य तयारी नसल्याने अनेकांची आयत्या वेळी अडचण  होते. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बाहेर पडत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

1. ट्रेक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ निवडावा –

ट्रेकला जाण्यापूर्वी नेहमी त्या दिवसाची हवामान परिस्थिती समजून घ्यावी. पावसाळ्यात रात्रीच्या ट्रेकपेक्षा दिवसाचा ट्रेक सुरक्षित असतो. खासकरून जर तुम्ही ट्रेकिंग क्षेत्रात नवीन असाल किंवा तुम्ही स्वतःच्या कुटुंब आणि लहान मुलांसोबत ट्रेकिंग करत असाल. मुसळधार पावसानंतर ट्रेक करायला सुरुवात करू नये. कारण मुसळधार पावसात ट्रेकिंगचा मार्ग बिघडतो व चढणे किंवा उतरणे कठीण होते. शिवाय, जर पाय वाटेवर धबधबे किंवा ओढे असतील तर पायाखाली रस्ते निसरडे होण्याची शक्यता असते व ही गोष्ट तुमच्या ट्रेकला असुरक्षित बनवते.

2. योग्य सामानाची निवड करावी –

ट्रेक करताना बऱ्याच सामानांची गरज लागू शकते. तुम्ही किती काळ ट्रेक करणार आहेत? यावर सामानाची यादी ठरते. पण, प्राथमिक गोष्टींमध्ये टी शर्ट, पॅन्ट, आतील कपडे, टॅावेल, सॅाक्स, रुमाल, नॅपकिन, टॅायलेट किट, मोबाईल, चार्जर, वायर, हेड टॅार्च, सेल, खाण्याचे साहित्य, स्लिपर, वॅाकींग स्टीक इत्यादी सामान हे आपल्या जवळ कायम असावेच व या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्लॅस्टीकच्या पिशव्या वापराव्या.ओल्या कपड्यांसाठी दोन पिशव्या जास्त घ्याव्या. सेफ्टी इक्युपमेंट म्हणून 50 फुट रोप, 4/5 कॅराबाइनर, 1 डिसेंडर, 2 हारणेस, 1 फोल्डींग स्ट्रेचर या गोष्टी घ्याव्या.

3. एकट्याने ट्रेकिंग करणे टाळा आणि स्थानिक मार्गदर्शकांची सहाय्यता घ्या –

पावसाळ्यात ट्रेकिंग हे कायम किमान 5 लोकांच्या गटांनी करावे. पावसाळ्यात ट्रेकिंगला कधीही हलके घेऊ नये. कारण अगदी अनुभवी ट्रेकर्स यांच्याबरोबर ही दुर्दैवी घटना होऊ शकतात. जर तुम्ही याआधी कधीही ट्रेक केले नसेल आणि एखादा अनुभव घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या सहलीत सामील होण्यासाठी अनुभवी ट्रेकर किंवा स्थानिक मार्गदर्शक सोबत घ्यावा. अनपेक्षित ट्रेलवर ट्रेकिंग करणे रोमांचक आणि साहसी वाटू शकते, परंतु एक वाईट अनुभव तुम्हाला आयुष्यभर ट्रेकिंगविरुद्ध मनात आघात करू शकतो.

4. ट्रेकिंगच्या आधी पर्वताची अवघडपणाची पातळी समजून घ्यावी –

ट्रेकला 3 प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते जसे की सोपे, मध्यम आणि अवघड. पण पावसाळ्यात अगदी सोपा दिसणारा ट्रेकही चढणे अवघड जाऊ शकते, त्यामुळे ट्रेकबद्दल आणि ट्रेक कसा असेल याची जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करावा. खासकरून स्वतःच्या ट्रेकिंग अनुभवाप्रमाणे योग्य स्थळ निवडावे.

5. पावसाळी किटकांविरूद्ध स्वत:ला सुरक्षित करावे – 

सहकारी ट्रेकर्ससोबत, तुमच्यासोबत भरपूर डास व इतर कीटक सुद्धा असतील. ओले हवामान या कीटकांच्या जीवनासाठी योग्य ठरते म्हणून त्यांचे प्रमाण वाढते. यामुळे डासांमुळे होणा-या आजारांपासून तुमचा बचाव होईल याची काळजी आपण डास प्रतिबंधक गोष्टी वापरून करू शकतो. कुठला कीटक आपल्या नकळत आपल्याला चावलाच तर लगेच तिथे क्रिम अथवा मीठ लावून शरीराचा तो भाग स्वच्छ करावा.

6. नेहमी उत्साही आणि हायड्रेटेड रहावे – 

तुमच्याकडे इच्छाशक्ती असताना अनुभवाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला ताकदीची आवश्यकता असते. ट्रेक करत असताना तुम्हाला तत्काळ ऊर्जा मिळावी यासाठी काही निरोगी व हलके खाद्यपदार्थ जवळ ठेवावे. ट्रेकिंग करताना पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे, अन्यथा शरीरात कमी पाण्यामुळे अशक्त होऊ शकते. स्वच्छ पाण्याच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवावी. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आपण ज्यूस किंवा एनर्जी पेयांची सुद्धा मदत घेऊ शकतो.

7. आपत्कालीन नंबर –

आयोजकांचे व त्यांच्या ऑफिसचे मोबाईल नंबर, ट्रेकची माहिती, ट्रेकवरून कधी घरी परतणार? याची माहिती कुटुंबियांना अवश्य द्यावी. तसेच कुटुंबियांचे नंबर सुद्धा आयोजकांना द्यावे. त्याबरोबरच ट्रेकच्या परिसरातील फायर ब्रिगेड, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन या सर्वांच्या संपर्काची माहिती आपल्याबरोबर असावी.

8. रस्त्यावर खुणा कराव्या –

येता-जाता जो रास्ता आपण वापरतो तिथे जाताना साधारण प्रत्येक 50 मीटरवर आपल्या लक्षात राहील अशी काहीतरी खूण करावी, ज्याने आपल्याला येण्या-जाण्याचा मार्ग नीट लक्षात राहतो. जर, समजा आपण मार्ग चुकलो तर परत मागे वळून आपणच केलेल्या खुणांच्या मदतीने आपण बरोबर मार्ग शोधू शकतो.

9. इतर सूचना –

ट्रेकमधील सर्वांबरोबर, गावातील गावकऱ्यांशी नम्रपणे वागा. तेच लोक अडचणीच्या वेळेला तुमच्या मदतीसाठी सर्वात आधी येऊ शकतात. अवघड ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह आवरावा व कोणत्याही प्रकारची नशा करु नये. प्लॅस्टिक व इतर कचरा निसर्गात करु नये. निसर्गात आरडाओरडा करु नये. ऐतिहासिक वास्तूंना कोणतेही नुकसान करु नये.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.