Pimpri : दिघी, बोपखेल, भोसरीतील 524 एकर जमिनीचा विकास आराखडा तयार करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri ) आणि हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड यांच्या वतीने जमिनीच्या विकासासाठी आणि संभाव्य विकासाच्या बाबींचा शोध घेण्यासाठी भागधारकांच्या बैठकीचे चिंचवड येथे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या आळंदी रस्त्यावर असलेल्या हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेडच्या कळस, दिघी, बोपखेल आणि भोसरी या चार गावांच्या 524 एकर जमिनीचा संभाव्य विकास आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली.

या बैठकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी घडामोडींचे संक्षिप्त संगणकीय सादरीकरण केले आणि दिघी तसेच इतर परिसरातील जमिनीचा विकास कसा करता येईल यावर चर्चा केली. आयुक्त सिंह यांनी सादरीकरणात शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर भर दिला, ज्यामुळे शहराचा विकास होईल आणि गुंतवणूकदार गुंतवणूक करतील.

ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, मोशी हॉस्पिटल, रस्त्यांचा विकास, सफारी पार्क, सिटी सेंटर, वेस्ट टू एनर्जी, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबिलिटी सेल यांसारख्या महत्वाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीस पुणे महानगर प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, ज्ञानदेव जुंधारे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया
लिमिटेडचे संचालक राजीव दास तसेच सुवासिश दास इतर अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. त्याचप्रमाणे क्रेडाई, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे, एनबीसीसी लिमिटेड, जेएलएल, प्राइड ग्रुप, शेफलर इंडिया लिमिटेड, रिअल इस्टेट कंपन्या, आयटी कंपन्यांचे अधिकारी तसेच प्रतिनिधी, भागधारकही
बैठकीला उपस्थित होते.

NCP Crisis : अजित पवारच राष्ट्रीय अध्यक्ष! 31 बंडखोरांमध्ये शरद पवारांचे जवळचे आमदार; जाणून घ्या सविस्तर

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव तसेच हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका डी. थारा यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित (Pimpri) केले. महापालिकेच्या आळंदी रस्त्यावर असलेल्या हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेडच्या कळस, दिघी, बोपखेल आणि भोसरी या चार गावांच्या 524 एकर जमिनीचा संभाव्य विकास आराखडा तयार करणे, खरेदीदारांमध्ये गुंतवणूकीची संधी व बाजारपेठेची उपलब्धता यांचा समन्वय साधणे हे आजच्या बैठकीचे उद्दिष्ट होते. कळसचे क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते तर उर्वरित क्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येते.

राहुल महिवाल, विक्रम कुमार यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय उपाययोजना राबविण्यात येतील यावर आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा केली. बैठकीस उपस्थित विविध प्रतिनिधींनी जमिनीच्या विकासासाठी आपले विचार आणि सूचना मांडल्या. डी. थारा यांनी देखील भागधारकांना ईमेलद्वारे सूचना पाठविण्याची आणि दिघी येथील जमिनीला भेट देण्याची विनंती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.